आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत रावणपूजन, तर मेळघाटात मेघनाथ पूजनाची परंपरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दसऱ्याच्या दिवशी देशभर रावणदहन हाेत असताना, अमरावती जिल्ह्यातील आदिवासी समाजातर्फे मात्र रावणपूजन करण्यात येते. तसेच रावणाचा मोठा मुलगा मेघनाथाची पूजा करण्याची परंपरा आदिवासीबहुल मेळघाटात आहे. गोंडवणा साम्राज्याचे राज्यकर्ते म्हणून रावणाला आदिवासी समाजामध्ये मानाचे स्थान आहे. पराक्रमी महायोद्धा म्हणून रावणाला आदिवासींनी आदर्श पुरुष मानले आहे.

आदिवासी समाजाच्या उन्नतीकरिता रावणाने सामाजिक संदेश देत मार्गदर्शकाची भूमिका वठविली. समाजाचे रक्षण केले. आर्य-अनार्य यांच्यात झालेल्या महायुद्धात नायकाची धुरा सांभाळली, अशी अादिवासी समाजाची भावना अाहे. सम्राट अशोकाच्या काळात हिमालयाच्या निर्मितीच्या वेळी गोंडवणा खंड अस्तित्वात होता. या संपूर्ण खंडाचे नेतृत्व रावणाकडे होते. त्याकाळातील अनार्य वंशातील नायक म्हणून आजही आदिवासी बांधव रावण आणि मेघनाथ या याैद्ध्यांची पूजा करतात. रावणाच्या वंशातील प्रतिभा म्हणून वीरांगना राणी दुर्गावतीला या समाजात मानाचे स्थान आहे. दुर्गावतीच्या जयंतीदिनीच रावणपूजनाचा कार्यक्रम आदिवासी समाज उत्साहाने साजरा करताे. अमरावतीत दरवर्षी सार्वजनिकरीत्या रावणपूजन केले जाते.
अकाेला जिल्ह्यातही दशमुखी रावणमूर्तीचे पूजन
पातूर - अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सांगोळा या गावातही रावणाचे पूजन केले जाते. या गावाच्या वेशीवर रावणाची दशमुखी मूर्ती आहे. काळ्या पाषाणाच्या रावणाच्या या मूर्तीच्या दहाही तोंडांना गावकऱ्यांनी चांदीचे डोळेसुद्धा लावले आहेत.

या मंदिराबाबत एक अख्यायिका अाहे. दीडशे वर्षांपूर्वी नदीच्या काठावर असलेल्या ऋषिबुवांच्या मंदिरात एका मोठ्या झाडाची प्रतिकृती दगडावर कोरण्याचे ठरले. हे काम बाभुळगावच्या मूर्तिकाराला देण्यात आले. छन्नी, हातोडा घेऊन त्याने काळ्या पाषाणावर काम सुरू केले. मात्र, झाडाऐवजी त्याने दहा तोंडांची प्रतिमा काेरून ठेवली. ही मूर्ती पाहून सांगोळेकर नाराज झाले. शेवटी ही मूर्ती बैलगाडीत टाकून गावाच्या बाजूला नेऊन ठेवण्याचा निर्णय झाला. मात्र मार्गातील प्रत्येक गावाच्या वेशीवर बैलगाडी आपोआपच थांबायची. तेव्हा मूर्तीसमोर नारळ फोडून सांगोळ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची कबुली दिल्यावरच बैलगाडी पुढे सरकायची. अखेर या मूर्तीची सांगाेळ्यात नेऊन प्रतिष्ठापना करण्यात अाली. तसेच या मंदिराला रावण मंदिर संबाेधले जाऊ लागले, अशी या मंदिर स्थापनेची अाख्यायिका असल्याचे सांगितले जाते.
बातम्या आणखी आहेत...