आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षल्यांच्या आघाडीच्या संघटनांचेच आव्हान, वादग्रस्त परिपत्रक ठरले लाजीरवाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नक्षलवादी चळवळीला लगाम लावण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश येत असले तरी त्यांच्यासाठी मोर्चा सांभाळणाऱ्या आघाडीच्या संघटनांच्या कारवाया आटोक्यात आणणे हे सध्याचे खरे आव्हान अाहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले. गृहविभागाचे ते वादग्रस्त परिपत्रक आणि मांसविक्री बंदीबाबत निर्माण झालेला गैरसमज हे दोन्ही प्रसंग आपल्या सरकारच्या दृष्टीने लाजिरवाणे होते, अशी कबुलीही त्यांनी दिली.

नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ‘नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यात मागील वर्षभरात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी प्राणहानी टाळून अनेक मोहिमा राबवल्या. अगदी छत्तीसगडच्या सीमेत जाऊनही मोहिमा राबवल्या. नक्षलवाद्यांना मिळणारा पाठिंबा कमी होत असून, लोक पोलिसांना मदत करीत अाहेत. याच वेगाने काम सुरु राहिल्यास येत्या तीन-चार वर्षात नक्षल विरोधी मोहिमेत मोठे यश मिळेल. पण आज खरे आव्हान नक्षलवाद्यांचे नव्हे तर त्यांच्यासाठी मोर्चा सांभाळणाऱ्या आघाडीच्या संघटनांचे आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे, कुठला तरी वाद निर्माण करून दंगल घडवण्याचे या संघटनांचे प्रयत्न आहेत. आम्ही त्यावरही उपाययोजना केली आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ‘मागील वर्षभरात अाम्ही वेगाने काम करण्याचा प्रयत्न केला. अनेक पथदर्शी निर्णय घेण्यात आले. ते करताना सुरुवातीला नोकरशाहीचा प्रतिकार जाणवला.

आता त्यांची मानसिकता बदलत आहे. वरच्या पातळीवरील ७० टक्के नोकरशाही सरकारचा अजेंडा नीट राबवत आहे. मात्र, कनिष्ठ पातळीवरील ५० टक्के नोकरशाहीची मानसिकता अद्यापही बदललेली नाही. वर्षभरात आठशेवर अधिकारी-कर्मचारी निलंबित झाले. ५० जण बडतर्फ झाले. अनेकांवर इतर कारवाई झाली. त्यामुळे मानसिकता बदलायला वेळ लागणार नाही’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भाजप आणि शिवसेना वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे आचार-विचार, कार्यपद्धती वेगळ्या आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने दोन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे सर्वच मुद्यांवर दोन पक्षांमध्ये सहमती शक्य होत नाही. नागपुरातील एम्स आणि आयआयएम या दोन्ही संस्थांना जागा उपलब्ध झाली असून, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन अपेक्षित अाहे. मिहान प्रकल्पात रिलायन्स एरोस्पेसच्या प्रकल्पाचा १०० एकरातील पहिला टप्पा सुरु होणार अाहे,अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सुमीत ठाकूरवर कारवाई
गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कुणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट करतानाच ‘नव्या लोकांना पक्षात घेताना पोलिस रिपोर्ट बघितला जात नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील कुख्यात गुंड व भाजयुमाेच्या निलंबित शहराध्यक्ष सुमित ठाकूर प्रकरणावर बोलताना सांगितले. ठाकूरच्या गुन्हेगारी कारवाया लक्षात आल्यावर आम्ही कारवाई केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सिंचन घाेटाळा चाैकशी वेगात
विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी वेगात सुरु अाहे. चौकशीत काम खूप असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘अनियमितता आणि मनी लॉंडरिंग असे दोन तपासाचे भाग आहेत. त्यामुळे चौकशीला वेळ लागणार आहे.’
बातम्या आणखी आहेत...