आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिडकारलेल्या गर्भवतीस मिळाला ‘सखी’चा आधार, लग्नापूर्वी अल्पवयात झाले लैंगिक अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात राहणाऱ्या एका विवाहितेवर लग्नापूर्वीच अल्पवयीन असताना अत्याचार करून एका नराधमाने वर्षभर लैंगिक शोषण केले. यातून ही अल्पवयीन युवती गर्भवती झाली. दरम्यान तिचा विवाह झाला. विवाहानंतर अडीच महिन्याने पतीने तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता ती साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले.
 
त्यामुळे पतीने या विवाहितेला तिच्या नातेवाईकाकडे आणून सोडले, मात्र नातेवाईकांनीही झिडकारले. अखेर एका परिचारिकेने या पीडित विवाहितेला गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी शासनाच्या संकटग्रस्त महिलांचे आधार केन्द्र असलेल्या इर्विनमधील ‘सखी’ याठिकाणी आणले. यावेळी या केन्द्रातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तिला आधार देत, झालेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी राजापेठ पोलिस ठाण्यात नेले. या प्रकरणी नराधमाविरुद्ध गुरुवारी उशिरा रात्री पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.प्रवीण वामन शेलोकार (२६, रा. सोनोरा भिलटेक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 
 
यासंदर्भात पीडित विवाहितेने राजापेठ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, प्रवीणने ती अल्पवयीन असतानापासूनच वर्षभर अत्याचार केले. जीवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी या मुलीचे यवतमाळ जिल्ह्यातील एका युवकासोबत लग्न झाले. नंतर दोन ते अडीच महिन्यांनी प्रकृती ठिक नसल्यामुळे पतीने तिला रुग्णालयात नेले होते, त्यावेळी ती साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लग्नाला अडीच महिने पत्नी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचे ऐकून पतीच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे पतीने या विवाहितेला माहेरी आणून सोडले. दरम्यान नातेवाईकांनीही या विवाहितेला झिडकारले. 
 
अखेर एका परिचारिकेने आधार दिला या पीडितेला संकटग्रस्त महिलांच्या आधारासाठी सुरू झालेल्या ‘सखी’ केन्द्रात आणले. नव्याने सुरू झालेले हे केन्द्र इर्विनमध्येच आहे. याठिकाणी ‘सखी’च्या मदतीने गुरुवारी रात्री तिला राजापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी तिची व्यथा एेकून ‘सखी’च्या मदतीने गुरुवारी रात्री पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी प्रविण शेलोकारविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, ही घटना चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने राजापेठ पोलिसांनी प्रकरण चांदूररेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे. असे राजापेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले. 
 
‘सखी’कडे आलेले पहिले गंभीर प्रकरण 
संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी सुरू झालेल्या सखी केन्द्रामध्ये महिला बालकल्याण विभागाची मुख्य भूमिका आहे. दीड महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या केन्द्रात यापुर्वी घरगुती अत्याचार प्रकरणातील काही पीडित महिला आलेल्या आहेत. मात्र शारिरिक अत्याचार झाले त्यानंतर झिडकारले अशाप्रकारे गंभीर समस्येमध्ये असलेली पीडित या केन्द्राकडे आली, हे पहिलेच गंभीर प्रकरण आहे. असे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी राजश्री कोलखेडे यांनी सांगितले आहे. 
बातम्या आणखी आहेत...