आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा घरामध्ये गळा आवळून खून, कारण गुलदस्त्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अज्ञात आरोपीने एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा घरात शिरून गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील मध्यवस्ती गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोरनगरमध्ये गुरूवारी (दि. १४) रात्री वाजता उघडकीस आली. यावेळी मारेकऱ्यांनीच घरातील एलईडी चोरून नेला असावा, असा अंदाज व्यक्त हाेत असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मधुमालती जालंधर धारिया (६५ रा. किशोरनगर) असे मृतक सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे नाव आहे. मधुमालती या शहरातील न्यू हायस्कूल, बेलपुरा या शाळेत काही दिवसांपूर्वी मुख्याध्यापिका होत्या. मधुमालती यांचे पती जालंधर धारिया हे वकील असून ते शहर जिल्ह्यातील न्यायालयात वकिली करतात. धारिया दाम्पत्याचे किशोरनगरमध्ये प्रशस्त घर असून घरात मधुमालती त्यांचे पती हे दोघेच राहत होते. त्यांना दोन मुले असून,एक मुलगा श्यामनगर भागात तर दुसरा जबलपूर येथे राहतो. दरम्यान, गुरूवारी सकाळी धारिया हे न्यायालयीन कामानिमित्त तिवसा येथे गेले होते. त्यामुळे दिवसभर मधुमालती या एकट्याच घरात होत्या. दुपारच्या वेळी अज्ञात मारेकऱ्यांनी घरात शिरून त्यांच्या तोंडावर बेदम मारहाण केली. तसेच टिव्हीच्या केबलने त्यांचा गळा आवळून खून केला. सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान अॅड. धारिया हे घरी पोहोचले त्यावेळी मधुमालती या रक्ताच्या थारोळ्यात हॉलमध्ये मृतावस्थेत पडून होत्या. या थरारक प्रकारामुळे ते घाबरले त्यांनी ही माहिती श्यामनगर भागात राहणाऱ्या मुलाला पोलिसांना दिली. माहिती मिळताच प्रभारी पोलिस आयुक्त उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्यासह फ्रेजरपुरा,गुन्हे शाखा मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली. मारेकऱ्यांनी मधुमालती धारिया यांचा खून केला तसेच घरातून हॉलमध्ये असलेला एलसीडी चोरून नेला, असा संशय अॅड. धारिया यांनी व्यक्त केला आहे. हा खून चोरी लुटमारीच्या प्रकारातून झाला किंवा अन्य काही कारण या खुनामागे आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

धारिया यांच्या घरात खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील संशयित वस्तूंचा श्वानाला वास दिला. त्यावरून श्वान श्यामनगरच्या वळणापर्यंत गेले होते. रात्री उशिरापर्यत खून कुणी का केला, हे अद्याप पोलिसांच्या पुढे आले नव्हते. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. ही घटना परिसरात माहीत होताच धारिया यांच्या घरासमोर गुरूवारी रात्री हजारोंची गर्दी जमली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेनासाठी इर्विन रुग्णालयात रवाना केला. या वेळी घटनास्थळी एसीपी महेश जोशी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल मालविय, एपीआय रोशन शिरसाट, पीएसआय जितेंद्र ठाकूर, गुन्हे शाखेचे एपीआय देसाई, एपीआय फिरोजखान पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस पोहचले होते.

घरातील चारही कपाट बंदच : चोरट्यांनी मधुमालती यांचा खून करून घरातील एलईडी चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या व्यतिरीक्त धारिया यांच्या घरातील पहिल्या माळ्यावर दोन ते तीन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये चार कपाट आहेत. मारेकऱ्यांनी या कपाटाला हातसुद्धा लावला नसल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी पाहणीत पुढे आले आहे. त्यामुळे मारेकऱ्यांचा उद्देश हा केवळ खून करणे हाच होता काय? असाही प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला आहे. आणि तसे असेल तर वृद्ध महिलेचा खून कुणी का केला, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

मारेकऱ्यांचा शोध सुरू
वृद्धमहिलेचा खून गळा आवळून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच घरातून टिव्ही चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. खून कुणी का केला, याबाबत तपास सुरू असून मारेकरऱ्यांचा शोध आम्ही सुरू केला आहे. सोमनाथ घार्गे, प्रभारी पोलिस अायुक्त.
छायाचित्र: घटनास्थळाची पाहणी करताना प्रभारी सीपी घार्गे.