आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"महसूल'च्या अन्यायाविरोधात ट्रकचालक-मालकांचा एल्गार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासन नियमांचे पालन करूनही महसूल विभागाकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अमरावती ट्रकचालक-मालक युनियनच्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १८) आमदार डॉ. सुनील देशमुख यांना त्यांच्या निवासस्थानी निवेदन देऊन चर्चा केली. या वेळी युनियनच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची व्यथा डॉ. देशमुखांपुढे मांडली. अर्धा तास मोजक्या कार्यकर्त्यांनी डॉ. देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर केले. ट्रकचालक-मालकांवर अन्याय होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष वेधून ही समस्या दूर करण्याची मागणी केली.
मागील वर्षी जिल्हाधिकारी यांनी नवीन घाट लिलाव करताना घाटातूनच मोजमापाची तरतूद करून देऊ प्रत्येक घाटात सीसीटीव्ही कॅमेरे लावू, असे आश्वासन दिले होते. परंतु, वर्ष होऊनही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. रेतीघाटावर शासनाचा एक प्रतिनिधी प्रत्येक घाटावर नेमावा जेणेकरून गाडीचालकाला मालकाला त्रास होणार नाही, अशी मागणी केली. घाटातून दिलेल्या वेळेचा संदेश हा दिलेल्या वेळेपर्यंत वैध राहावा. गाडी मालकाकडे ब्रास रेतीची मागणी राहते त्या ठिकाणी मोठी गाडी जाऊ शकत नाही, तर लहान गाडीने ब्रास रेती टाकली तर ती गाडी पकडून थांबवल्या जाते.
दरम्यान, या वेळी नव्यानेच रेतीघाट लिलाव झाले अाहेत. युनियनचे सदस्य शासनाच्या नियमांचे पालन करूनही महसूल विभागाकडून अन्याय केला जात आहे. सात हजार रुपये देऊन रेतीघाटातून ब्रास (२०० फूट) रेती विकत घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. याची रीतसर पावती (रॉयल्टी) घाटवाल्याकडून दिल्या जाते. रेतीघाटातून रेती घेऊन जाण्यासाठी सकाळी सहा ते सायंकाळी सहा अशी शासनाच्या नियमानुसार वेळ आहे. परंतु, तहसीलदार, ट्रॅफिक पोलिस अडवून त्रास देत असल्याचे सदस्यांनी डॉ. देशमुख यांना सांगितले. ब्रासपेक्षा १० फूट जरी रेती जास्त असली तरी सर्व माल हा चोरीचा म्हणून आेव्हरलाेडच्या नावाखाली कार्यालयात जमा करतात. दरम्यान, ब्रासवर पाचपट दंड आकारून सदर माल चोरीचा असून, गुन्हे दाखल करतात, असे सदस्यांनी सांगितले. रेतीघाटवाल्याकडे मोजमाप नसून त्यांनी घाटातूनच ब्रास रेती मोजून दिली तर ही अडचण येणार नाही, याकडे युनियनने लक्ष वेधले. या वेळी युनियनचे सुनील रामटेके, समीर जिलानी, अय्युब खान, सोमेश्वर आप्पा मुंजाळे, बलवीर मोंगा आणि युनियनचे दोनशेवर सदस्य या वेळी उपस्थित होते.

तर हप्ते देणे बंद करा
प्रशासन तुमच्याशी इतक्या कडक पद्धतीने वागणूक देत असेल तर तुम्हीपण तटस्थ राहायला पाहिजे. पोलिस विभाग महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हप्ते देणे बंद करा, असे डॉ. देशमुख यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. जर तुम्हाला वाटत असेल नियमात राहूनही प्रशासनाकडून त्रास देण्यात येत आहे, मग हप्ते कशाला देता. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा, ज्या ज्या विभागाला हप्ते देता, त्यांना हप्ते देणे बंद करा, असे देशमुख यांनी सांगितले.

सामंजस्याने काढू समस्येवर तोडगा
रेतीघाट लिलाव ट्रकचालक-मालक युनियन यांच्यात नेमके कुठल्या कारणावरून वाद होत आहे, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमदार डॉ. सुनील देशमुख हे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेणार आहे. गुरुवारी गित्ते यांच्याशी चर्चा करून सामंजस्य मार्गाने यावर तोडगा काढण्याचे आश्वासन डॉ. देशमुख यांनी ट्रकचालक-मालक युनियनच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना दिले.