आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पुन्हा मृत्यूचे खड्डे! अपघातांचे वाढले प्रमाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेल्या कोऱ्या करकरीत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सध्या या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अन् त्याच्या खोलीचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताची गंभीर शक्यता बळावली आहे. शनिवारी दुपारी याच पाणी भरलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्यामुळे साईनगर भागातील एक महिला दुचाकीवरून कोसळली. त्याचवेळी मागून येणारी वाहने या महिलेच्या दुचाकीपर्यंत येऊन टेकली. दैव बलवत्तर म्हणून माेठा अनर्थ टकला मात्र त्या महिलेच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. पावसाळ्यातील पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची पूर्ण ‘वाट’ लागल्याने अजून पावसाळ्याचे दोन महिने बाकी आहेत, या काळात रस्त्यांची काय अवस्था होईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरातील अनेक मार्गांवरील हे जीवघेणे खड्डे वाहनचालकांसाठी ‘यमा’ची भूमिका बजावत असल्याने आणि जनसामान्यांचा जीव वाचविण्यासाठी महापालिका साबांविकडून कोणत्याच हालचाली होत नसल्यामुळे शहरवासीयांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.
यातील अनेक खड्डे हे पावसापूर्वीच केबलिंग भुयारी गटरच्या कामामुळे तयार झालेले आहे. हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. राजापेठ चौकाजवळ प्रचंड मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यात पाणी साचल्यानंतर हा खड्डा सहजासहजी वाहनचालकांना दिसत नाही. शनिवारी दुपारी याच पाणी भरलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्यामुळे साईनगर भागात राहणारी एक ४० वर्षीय महिला दुचाकीवरून खाली कोसळली. त्याचवेळी मागून येणारी वाहने या महिलेच्या दुचाकीपर्यंत येऊन टेकली,थोडक्यात अनर्थ टकला मात्र त्या महिलेच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी राजापेठ चौकात वाहनचालकांनी यंत्रणेविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला आहे. याचप्रकारे शहरातील गर्ल्स हायस्कूल ते पंचवटी चौकादरम्यान असलल्या विद्युत भवनसमोर खड्डे तयार झाले आहेत. तसेच वालकट कम्पाऊंडमधील सर्व मार्ग, चौधरी चौकाजवळील वळण मार्ग या मार्गांसह सद्या शहरातील अनेक मार्गांवर रस्त्यांची चाळणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वास्तविकता सद्या खड्डे पडलेले अनेक मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आले आहेत. मात्र तरीही त्या मार्गांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अधिकच धोकादायक ठरत आहेत.

पावसामुळे खड्डे तयार होण्यापूर्वीच शहरातील अनेक मुख्य मार्गांवर केबलिंगच्या कामामुळे मोठ मोठे जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे पावसाळा सुरू झाला तरीही बुजविण्याचे सौजन्य सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिकेकडून दाखविण्यात आले नाही. पावसात खड्डे बुजविण्याचे काम होऊ शकत नाही, ही बाब दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे. या खड्ड्यांव्यतिरिक्त खापर्डे बगिचा ते उस्मानिया मस्जीद उस्मानिया मस्जीद ते जैन छात्रायल (बसस्थानक मार्ग) भुयारी गटारच्या कामांसाठी अगदी मधोमध उखरून ठेवला आहे. उखरलेल्या रस्त्याला अजूनही वाहतूकीयोग्य करण्यात आले नाही. रस्ता उखरून त्यावर माती टाकण्यात आली आहे. पाऊस आल्यामुळे ही माती रस्त्यांवर आली असून, त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. मात्र भुयारीचे काम करणाऱ्या मजीप्रा, तसेच खड्डे बुजविण्याची जबाबदारी असलेल्या साबांवि आणि महापालिकेने तीन महिन्यांनंतरही संबंधित रस्ता वाहतुकीयोग्य केला नाही. यावरून संबंधित यंत्रणेला नागरिकांच्या जीवीताशी काही एक देण घेण नसल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
खड्डे प्रकरणात पोलिसांनी मजूर कंत्राटदाराविरुद्ध तर साबांविने एका प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल केला .तरीही शहरातील खड्ड्यांची समस्या अद्यापही कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पाऊस थांबताच बुजवणार खड्डे
^सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील शहरातील ज्या मार्गांवर खड्डे तयार झाले असेल, त्या ठिकाणांची पाहणी करून ते बुझविण्याचे आदेश आम्ही देतो. पाऊस बंद झाल्यानंतर तातडीने खड्डे बुझविण्यात येईल. विजयबनगिनवार, अधीक्षक अभियंता.सार्वजनिक बांधकाम विभाग.

जेटपॅचरद्वारे तातडीने बुजवणार खड्डे
^शहरात केबलिंसाठीखोदलेले खड्डे आम्ही बुझवले आहे. आता पावसामुळे खड्डे तयार झाले असतील तर त्याची माहिती घेऊन पाऊस उघडल्यानंतर जेटपॅचरद्वारे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुझविण्यात येतील. याचवेळी राजापेठ विद्युत भवनसमोर असलेले खड्डे तातडीने बुझविण्याबाबत कंत्राटदाराला सांगितले आहे. -जीवन सदार, शहर अभियंता,महानगरपालिका,अमरावती.

केबलिंगचे सर्व खड्डे बुजवल्याचा प्रबळ दावा
शहरात महापालिकेच्या हद्दीतील मार्गांवर केबलिंगमुळे जितके खड्डे मागील एक ते दीड वर्षांपासून तयार झाले आहेत. ते सर्व खड्डे बुजविण्यात आले असून, शेवटचा खड्डा शनिवारी दुपारी बुझविण्यात आल्याचा दावा महापालिकेचे शहर अभियंता जीवन सदार यांनी केला आहे. मात्र अनेक खड्डे बुजविल्यानंतर त्यामधील खडी वाहून गेल्याने ते धोकादायक बनल्याचे वास्तव कायम आहे. याचवेळी साबांविचे अधीक्षक अभियंता बनगिनवार यांनी सांगितले की, आम्ही एका प्रकरणात फौजदारी कारवाई केली. मात्र मागील दीड वर्षांपासून खड्डे का बुजले नाहीत, हा प्रश्न कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...