आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्कऑर्डर निघून झाले ५५ दिवस; तरीही रस्ता भकास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उस्मानिया मशीद ते जैन छात्रावास दरम्यान भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या सुमारे पाचशे मीटरच्या रस्त्याच्या दुरूस्तीची ‘वर्कऑर्डर’ निघून सुमारे ५५ दिवसांचा कालावधी उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीच्या ‘सौजन्या’ने जनसामान्यांना रोज जीव तळहातावर घेऊन झटके खावे लागत आहे. शासनाचा ‘स्मार्ट वर्क’चा नारा असला तरी माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही बांधकाम विभागाचे पोलिसांना दिलेले पूर्वपरवानगीचे पत्र शहरातच महिनाभर फिरत राहिल्याची धक्कादायक माहितीही यानिमित्ताने समोर आल्याने बांधकाम विभाग किती स्मार्ट झाला याचा प्रत्यय आला आहे.
भुयारी गटार योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बसस्थानक मार्गावरील जैन छात्रालय ते उस्मानिया मशीदपर्यंतचा जवळपास पाचशे मीटरचा रस्ता अर्धा खोदून ठेवला होता. त्यामुळे वर्दळीच्या या मार्गावर केवळ सुमारे दहा ते पंधरा फुटाचा रस्ता वाहतुकीयोग्य राहिला. वाहतुकीसाठी मजीप्राने भुयारी गटाचे काम पूर्ण करून २३ ऑगस्ट २०१६ ला साबांविला या रस्त्याची नुकसान भरपाई म्हणून २९ लाख २६ हजार रुपये धनादेशाद्वारे दिले. किमान त्यानंतर तातडीने सदर मुख्य रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते. परंतु, खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बांधकाम विभागाने मुरूम टाकला. यामार्गाने प्रचंड वर्दळ जड वाहतूक असल्यामुळे या रस्त्यावर टाकलेल्या मुरूमाची माती झाली. पाण्याने अनेक ठिकाणांची माती वाहून गेल्याने जीवघेणे खड्डे तयार होऊन हा मार्ग साक्षात मृत्यूला आमंत्रण देणारा ठरला. वाहनांना जाण्यासाठी प्रचंड अडचणी, धुळीचे साम्राज्य, मुख्य रस्त्यातच खड्डे असल्यामुळे दुचाकी चालकांना दररोज या मार्गावरून जाताना जीव तळहातावर घेऊनच जावे लागत आहे. या मार्गावरील अनेक महिने मुख्य ठिकाणी ‘मॅनहोल’ उघडेच होते. या धोकादायक ठरलेल्या रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. मात्र नुकतेच बदलून गेलेले साबांविचे अधीक्षक अभियंता विजय बनगिनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन ते बसस्थानक ते अंध विद्यालय हा मार्ग सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. वास्तविक या मार्गावर सिमेंट कॉक्रीट पडायला कोणते वर्ष उजाडणार हे अद्याप साबांविच्याच अधिकाऱ्यांना सांगता आले नाही. कॉंक्रीटच्या रस्त्याच्या काढलेल्या निविदाही अद्यापपर्यंत कंत्राटदारांकडून स्वीकारण्यात आल्या नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांदा निविदा काढण्यात येणार आहे. या कामाची आतापर्यंतची प्रगती पाहता हा रस्ता कॉंक्रीटचा होण्यासाठी किमान दोन ते अडीच वर्ष लागणार असल्याचे साबांविचे कार्यकारी अभियंता एस. आर. जाधव यांनी दिलेल्या माहिवरून स्पष्ट होत आहे.दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रक्कम प्राप्त होताच २४ ऑगस्ट २०१६ लाच साबांविने ‘वर्कऑर्डर’ काढली. डागडुजीच्या कामासाठी बांधकाम विभाग तब्बल ११ लाख हजार रुपये खर्च करणार आहे. यासाठी खोदकाम करून मुरूम, त्यानंतर तो टणकपणा येण्यासाठी आवश्यक प्रक्रिया शेवटी थोड्याप्रमाणात डांबर टाकण्यात येणार असल्याचे साबांविचे कनिष्ठ अभियंता सोनोने यांनी सांगितले. दरम्यान, हा मुख्य मार्ग असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने गणेशोत्सव दुर्गाेत्सव होईपर्यंत या रस्त्याचे काम करू नका, असे पोलिसांनी आम्हाला सांगितले होते, वास्तविकता आम्ही पोलिसांकडे परवानगीसाठी १२ सप्टेंबरलाच पत्र दिले होते. त्यामुळेच काम उशीराने सुरू होत आहे, अशी माहिती साबांविचे उपविभागीय अभियंता एन. आर. देशमुख यांनी सांगितले.

पत्र महिनाभर फिरले शहरातल्या शहरातच
सदर रस्ता अत्यंत वर्दळ गर्दीचा असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक एका मार्गाने करणे गरजेचे आहे. यासाठी बांधकाम विभागाने पोलिस विभागाची परवानगी घेण्यासाठी महिनाभरापूर्वी पत्र पाठवले. परंतु, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संबंधित पत्र महिनाभर शहरातच फिरत राहिले.

‘वर्कऑर्डर’ नंतर कामाला इतका उशीर लागायलाच नको
^शहरातीलमुख्यमार्गावर काम करण्यासाठी ‘वर्कऑर्डर’ काढल्यानंतर काम सुरू करायला, इतका वेळ लागायलाच नको. या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लवकरच चर्चा करून तोडगा काढणार आहे.’’ डॉ.सुनील देशमुख, आमदार, अमरावती.

पत्र मिळताच दिली परवानगी, ही तर साबांविची घोडचूक
^सांाबविकडूनपरवानगीसाठीआलेले पत्र सोमवारी (दि. १७) सायंकाळी आम्हाला प्राप्त झाले. दरम्यान मंगळवारी (दि. १८) सकाळीच आम्ही साबांविला परवानगी दिली. त्यांनी आठ दिवसांपूर्वी सदर पत्र एसीपी फ्रेजरपुरा नावाने दिले होते. त्यामुळे आमच्यापर्यंत पोहचण्यासाठी उशीर झाला होता. ही साबांविची घोडचूक आहे.’’ पंजाबरावडोंगरदिवे, एसीपी, वाहतूक शाखा.

सिमेंट काँक्रीटच्या कामासाठी काढणार दुसऱ्यांदा निविदा
^रेल्वेस्थानक ते अंध विद्यालय हा जवळपास दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तसेच रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक हा सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. यासाठी आम्ही निविदा काढली. मात्र, कोणीही निविदा घेतली नाही. आता दुसऱ्यांदा निविदा काढणार आहे. ’’ एस.आर. जाधव, कार्यकारी अभियंता, सांबावि,अमरावती.

शहर वाहतूक पोलिसांच्या परवानगीनंतर काम करणार सुरू
^सदररस्त्याचे काम करताना दोन्ही दिशेची वाहतूक एका दिशेने करावी लागणार आहे. त्यामुळे परवानगीसाठी आम्ही अंदाजे महिनाभरापूर्वीच पोलिसांना पत्र पाठवले होते. पण ते पेालिसांपर्यंत पोहचले नाही, मंगळवारी (दि. १८) वाहतूक पोलिसांकडे पत्र पोहचले. त्यांच्याकडून परवानगी मिळताच काम सुरू करणार आहे.’’ श्री.सोनोने, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग.
बातम्या आणखी आहेत...