आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेता हरपला, रा.सू. गवई यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि बिहार- केरळचे राज्यपाल दादासाहेब ऊर्फ रा. सू. गवई यांचे शनिवारी येथील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या दारापूर या मूळ गावी रविवारी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गवई यांच्या मागे पत्नी डॉ. कमल आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या मोठा मुलगा भूषण गवई हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती आहेत, तर धाकटा मुलगा राजेंद्र गवई हे रिपाइंचे (गवई) नेते आहेत. त्यांचे पार्थिव प्रारंभी न्या. गवई यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. नंतर ते १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. ३० ऑक्टोबर १९२९ रोजी जन्मलेले रामकृष्ण सूर्यभान गवई हे आंबेडकरी चळवळ आणि राजकारणातही रा. सू. गवई या नावानेच लोकप्रिय होते. १९६४ ते १९९४ अशी तब्बल तीस वर्षे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. १९६८ ते ७८ या काळात विधान परिषदेचे अध्यक्ष आणि १९८६ ते ८८ या काळात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत ते अमरावतीमधून लोकसभेवर निवडून गेले होते. २००६ मध्ये त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. नंतर २००८ मध्ये त्यांची केरळच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. ऑगस्ट २०११ पर्यंत ते केरळचे राज्यपाल होते. प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते पिनयारी विजय यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यास त्यांनी मंजुरी दिल्यामुळे मोठे वादंग उठले आणि गवईंवर टीकेची झोड उठली होती.

गवई हे नागपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष होते. निधनापर्यंत हे पद त्यांच्याकडेच होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ऐक्याचे खंदे समर्थक होते. रिपाइंचे सर्व गटतट एकत्र येऊन झालेल्या ऐतिहासिक दलित ऐक्यानंतर गवईंनी एकीकृत रिपाइंच्या अध्यक्षीय मंडळाचे नेतृत्वही केले होते; परंतु प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, एन. एम. कांबळे हे बाहेर पडल्यामुळे हे ऐक्य फार काळ टिकले नाही.

अजातशत्रू गमावला
गवई यांच्या निधनामुळे राज्याने अजातशत्रू नेता गमावला. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

गवई हे परिवर्तनवादी विचारांचे नेते होते. त्यांनी कायम समाजातील उपेक्षितांचे प्रश्न लावून धरले. सामाजिक व प्रशाकीय क्षेत्रात त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवला होता, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गवई यांना आदरांजली अर्पण केली.
गवई यांच्या निधनामुळे देश मार्गदर्शकाला मुकला आहे. विद्यमान परिस्थितीत देशाला गवईंसारख्या परिवर्तनवादी व धर्मनिरपेक्ष नेत्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

आज दारापूर येथे अंत्यसंस्कार
दादासाहेबांचे पार्थिव अमरावती येथील काँग्रेसनगरच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. रविवारी सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा सुरू होईल. दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात येतील.