आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस ५,७५० रुपयांवर, दोन दिवसांत कापसाचे दर सरासरी अडीचशे रुपयांनी वधारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बाजारात मागणीच्या तुलनेत कापसाचा अल्प पुरवठा होत असल्यामुळे दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर वधारत आहे. याचा सकारात्मक परिणाम कापसाच्या भावावर झाला असून स्थानिक खासगी बाजारातही कापसाचे दर वाढले आहे. दोन दिवसांत कापसाच्या दरात सरासरी अडीचशे रुपयांची वाढ झाली असून सोमवारी जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी येथील जिनिंगवर सर्वाधिक कमाल ५७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. 
सध्या देशभरातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाची आवक मंदावली आहे. त्यातुलनेत देशातील कापसाचे प्रमुख आयातदार देश पाकिस्तान, बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणात कापसाची मागणी सुरू आहे. परंतु मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे कापसाचे दर वधारत असल्याचे चित्र वायदे बाजारात दिसून येत आहे. चीनमधूनही कापसाची मागणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत चीनकडून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता इंटर कॉन्टीनेंन्टल एक्सचेंजने (आसीई) व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दिवसेंदिवस कापसाचे दर वाढत असल्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही दिसून येत असून जिल्ह्यातील कापसाच्या खासगी बाजारात कापसाचे दर दोन दिवसांत सरासरी अडीचशे रुपयांनी वधारले आहे. जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी येथील खासगी बाजारात कापसाला सर्वाधिक दर मिळाले. सोमवारी अंजनगाव सुर्जी येथील जे. डी. एस जिनिंगवर कापसाला कमाल ५७५० तर किमान ५६५० रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आल्याची माहिती संचालक संजय हाडोळे यांनी दिली.खर्चाच्या तुलनेत सध्याचा मिळणारा भाव अद्यापही शेतकऱ्यांचे समाधान करू शकल्यामुळे किमान सहा ते सात हजार रुपये भावाच्या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री सध्या थांबवली आहे. याचा परिणाम कापसाच्या आवकेवर झाला आहे. 

उत्पादनात घट 
मागीलवर्षीच्या तुलनेत देशात यावर्षी ५० ते ६० लाख गाठींचे उत्पादन घटणार आहे. याचा परिणाम देशातील कापसाच्या भाववाढीवर झाला आहे. -संजय हाडोळे, संचालक, जे.डी.एस. जिनिंग,अंजनगाव. 

खासगी बाजारातील सोमवारचे भाव 
बाजारपेठ किमान कमाल 
अमरावती ५५५० ५६०० 
परतवाडा - ५६७५ 
अंजनगाव सुर्जी ५६५० ५७५० 
दर्यापूर ६०० ५६५० 
वरुड - ५५५० 
धामणगाव रेल्वे ५००० ५५३५ 
 
यावर्षी पाकिस्तानात कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. देशातील एकूण कापसाच्या उत्पादनापैकी दोन तृतीयांश कापूस पाकिस्तानात निर्यात केला जातो. पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात अमेरिका, ब्राझिल, आफ्रिका, भारत या देशातून कापसाची आयात सुरू आहे. त्यातच गरजेमुळे कापसाच्या जागतिक बाजारात चीनने नव्याने उडी घेतल्याने चीननेही कापसाची आयात सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात कापसाच्या भाववाढीची शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी गाठींची साठवणूक सुरू केली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापूस वधारला आहे. कराची कॉटन असो.नुसार वायदे बाजारात शनिवारी प्रति मौंड (४० किलो) ६९५० रुपये (पाकिस्तानी चलन) प्रति किलो दर मिळाला.