आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief Mohan Bhagwat Gets Top Category Z+ Security

सरसंघचालक मोहन भागवतांची सुरक्षा ‘सीआयएसएफ’ कडे, सव्वाशे जवानांचा ताफा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना ‘सीआयएसएफ’ची झेड प्लस सुरक्षा पुरवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर मंगळवारी ११ ऑगस्टला दुपारी ‘सीआयएसएफ ’च्या विशेष पथकाने नागपुरातील संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली.

गेल्या १५ वर्षांपासून नागपुरात महाल परिसरात असलेल्या संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था राज्य राखीव पोलिस दलाकडे होती. मात्र, अलिकडेच केंद्रीय गृहमंत्रालयाने जुलैमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यावर त्यांना केंद्रीय निमलष्करी दलाची झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) पथक नागपुरात दाखल झाले. दुपारी या पथकाने राज्य राखीव पोलिस दलाकडून मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली. या सुरक्षा व्यवस्थेत दलाचे ६० जवान २४ तास सरसंघचालक भागवत यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेचे नियंत्रणही आता दिल्लीतूनच होणार असल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा व्यवस्थेतील जवानांची निवासाची व्यवस्था मुख्यालयाजवळील भाऊजी दप्तरी शाळेत राहणार अाहे,अशी माहिती देण्यात आली. यापूर्वी ही व्यवस्था महापालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळेत करण्यावरून राजकीय वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, संघाच्या वतीने राज्य राखीव दलाच्या जवानांना निरोप देण्यात आला. यावेळी सरसंघचालक डॉ. भागवत यांनी जवानांशी तासभर संवाद साधला,अशी माहिती मुख्यालयातील सूत्रांनी दिली.

२००६ मध्ये झाला होता मुख्यालयावर हल्ला
२००६ च्या जूनमध्ये संघ मुख्यालयावर लष्कर-ए-तैयबा च्या तीन संशयित दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. मात्र, तेथे तैनात असलेल्या राज्य राखीव दल तसेच शहर पोलिसांच्या पथकांनी तिन्ही दहशतवाद्यांना मुख्यलयापासून काही फुटांच्या अंतरावर ठार केले होते. आता याकूब मेमन फाशी प्रकरणानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊनही मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.