आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची भूमिका म्‍हणजे \'अर्धनारीनटेश्‍वराचा प्रयोग\', तरुण भारतमध्ये उध्‍दव ठाकरेंवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- शिवसेनेच्‍या राज्‍यव्‍यापी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्‍या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरेंनी नोटबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचऱ्या शब्‍दात टीका केली होती. यावर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर कोणत्‍याही मोठया भाजप नेत्‍याने नंतर भाष्‍य केले नाही. मात्र संघाला हे भाषण चांगलेच झोंबल्‍याचे दिसत आहे. संघाचे मुखपत्र तरुण भारत दैनिकामध्‍ये उध्‍दव ठाकरेंच्‍या या भाषणावर जोरदार टीका करण्‍यात आली आहे.
 
हातात शिवबंधन बांधून शिवसनेचे मंत्री मंत्रीमंडळात भाजपच्‍या मांडीला मांडी लावून  बसले आहेत. मात्र त्‍यांचे पक्षप्रमुख मित्रपक्षावर आक्रस्‍ताळी आगपाखड करीत आहेत. सत्ताही सोडायची नाही आणि आपले वेगळे अस्तित्व ठेवण्यासाठी सतत टीकेचा सूरही चालू ठेवायचा, असा हा ‘अर्धनारीनटेश्‍वरा’चा प्रयोग चालला आहे. अशा शब्‍दात तरुण भारत दैनिकामध्‍ये उध्‍दव ठाकरेंवर टीका करण्‍यात आली आहे.
 
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्‍यास सुरवात झाली आहे. त्‍यातच पुणे, नाशिक या महत्‍वाच्‍या महापालिकेंमध्‍येही याच दरम्‍यान निवडणुका होत आहेत. अशातच या दैनिकाने उध्‍दव ठाकरेंवर टीका केल्‍याने भाजप आणि शिवसेना हे दोन्‍ही पक्ष येत्‍या निवडणुकांमध्‍ये आमने सामने येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.
   
काय म्‍हटले अग्रलेखात 
- शिवसेना पक्षप्रमुखांतर्फे रोज भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका म्हणण्यापेक्षा आगपाखड करण्याचे सत्र सुरु आहे. अगदी आम्हीच आक्रमक, हे दाखविण्यासाठी संघावरही टीका करण्याची संधी हे सोडत नाहीत. एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचे, निर्णयात भागीदारी ठेवायची आणि त्याच निर्णयावर टीकाही करायची, हे गणित काही सुज्ञ मतदारांना पटणारे नाही. 

- नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयावर शिवसेनेने अत्यंत कठोर भाषेत रोज नकारात्मक टीका करण्याची भूमिका घेतली आहे. लोक गल्लोगल्ली चर्चेत म्हणू लागले की, शिवसेनेला जर भारतीय जनता पक्षाच्या सरकारची भूमिका इतकी पटत नसेल, तर त्यांनी केवळ शिवराळ भाषेत टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडले पाहिजे.

- मात्र, सत्तेच्या चुंबकापासून दूर झाले तरी किंवा सत्तेत असल्यामुळे मवाळ भूमिका घेतली तरी पक्षसंघटनेतील ‘शिवबंधन’ही ढिले होईल, अशी भीती वाटत असल्याने, सत्ताही सोडायची नाही आणि आपले वेगळे अस्तित्व ठेवण्यासाठी सतत टीकेचा सूरही चालू ठेवायचा, असा हा ‘अर्धनारीनटेश्‍वरा’चा प्रयोग चालला आहे. 

- राजकारण आणि समाजकारणात केवळ हेका चालत नसतो. आपले चरित्र आणि आपली भाषा यांचा मेळ असावा लागतो. तुम्ही कितीही चढ्या आवाजात बोला, तुमची करणी जर त्याला सुसंगत नसेल, तर जनता एका मिनिटात तुमची चव ओळखते. 

- उध्‍दव ठाकरेंनी भाषणात टीका करताना म्‍हटले होते की, देश चीनच्या कम्युनिस्ट हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे. असे वातावरण पंतप्रधान मोदी यांनी देशात निर्माण केले आहे. याचा समाचार घेताना तरुण भारतने म्‍हटले आहे, शिवसेनेला हुकूमशाहीचा साक्षात्कार इतरांमध्ये पाहण्‍याची खरे म्हणजे गरजच नाही. ठाण्यात एका नगरसेवकाने शिवसेनेशी ‘गद्दारी’ करताच बिचार्‍याला अदृश्यच व्हावे लागले होते. संभाजीनगरला एका पत्रकाराने शिवसेनेला न रुचणारा प्रश्‍न पत्रकार परिषदेत विचारताच, सगळ्याच पत्रकारांना सेनेकडून चिनी हुकूमशाहीचा असा काही प्रसाद दिला गेला की, काही पत्रकारांना जीव वाचविण्यासाठी झाडावर बसण्याची वेळ आली होती. 

- शिवसेना पक्षप्रमुख विनाकारण उसने अवसान आणून आक्रमकतेचा आभास निर्माण करत असतील, तर त्यांना मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जनता मतदानातून आपली नापसंती व्यक्त करण्याचीच जास्त शक्यता आहे. त्याच त्या चुका वारंवार करत मतदारांना मूर्ख समजण्याचा खेळ त्यांनी न खेळलेला बरा. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...