अमरावती - बालकांचा मोफत सक्तीचे शिक्षण कायद्यानुसार जिल्ह्यात ७७१ जागांच्या प्रवेशासाठी दुसरी सोडत काढण्यात आली. पहिल्या सोडतीत प्रवेश मिळालेल्या ११४२ अर्जामधून दुसऱ्या सोडतीत ७७१ वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे प्रवेश केले जाणार आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना काही शाळांमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
जिल्ह्यातील नामांकित १९२ शाळेतील नर्सरी पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी आरटीई अंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सर्व शिक्षा अभियान अंतर्गत राबवली जात आहे. इंग्रजी माध्यमांच्या या नामांकित खासगी शाळांमध्ये नर्सरीच्या ७६१ तर पहिल्या वर्गात २४६७ अशा एकूण ३२३८ जागांवर प्रवेश दिले जाणार आहे.
३२३८ जागांसाठी पहिली सोडत जूनला काढण्यात आली. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी एकूण ३५८२ अर्ज प्राप्त झाले होते, त्यातून पहिल्या सोडतीनंतर १८३२ जागांवर प्रवेश देण्यात आले. विद्यार्थ्यांचे घर तसेच शाळांचे अंतर जुळले नसल्याने पहिल्या सोडतीत ११४२ अर्ज विचारात घेण्यात आले नाही. दुसऱ्या सोडतीमध्ये ११४२ अर्जातून ७७१ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केले जाणार आहे. दुसरी सोडत पुणे येथून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली.
दुसऱ्या सोडतीचे एसएमएस पालकांना पाठवले जात आहे. जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या खासगी विनाअनुदानित १९६ शाळांमधील २५ टक्के आरक्षीत जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.
प्रवेश नाकारण्याचा आहे अधिकार
खोटे कागदपत्रांचा अाधार घेत वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागांवर प्रवेश घेतला जाण्याची शक्यता आहे. असा प्रवेश घेतला जात असेल तो नाकारण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना आहे. पालकांचे उत्पन्न, जात, निवास आदी पुरावे तपासून प्रवेश देण्याचे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले.