आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर माहितीचा ऑनलाइन अधिकार पोहोचला मनपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ऑनलाइन साज चढलेला माहितीचा अधिकार (आरटीआय) मनपात दाखल झाला असून, याबाबतच्या प्रत्यक्ष कृतीचे धडे गुरुवारी (दि. ११) संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यासाठी एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांवर कशी प्रक्रिया करावी, याचे बारीकसारीक तपशील या वेळी समजावून सांगण्यात आले.

ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिकांना घरबसल्या हवी ती माहिती मिळवणे शक्य झाले असून, अधिकाऱ्यांचीही कटकट बऱ्यापैकी कमी झाली आहे. तक्रारदार आला तेव्हा अधिकारीच गायब होते किंवा तक्रारदाराला पाहिजे ती माहिती अधिकाऱ्यांनी दिलीच नाही म्हणून संबंधित अधिकारी तक्रारदारांमध्ये बाचाबाची होण्याचे प्रमाण वाढले होते. बरेचदा नागरिकांना यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठेही झिजवावे लागायचे. या सर्व बाबींवर तोडगा म्हणून शासनाने प्रजासत्ताक दिनापासून ‘आपले सरकार’ या नावाने नवी योजना सुरू केली असून, त्याच दिवसापासून माहितीचा अधिकार ऑनलाइन केला आहे.

यासाठी नागरिकांना इंटरनेटशी जोडलेल्या संगणकाचा आधार घ्यावा लागणार आहे. ज्यांच्याकडे ही सोय आहे त्यांना घरबसल्या किंवा ज्यांच्याकडे नाही त्यांना सायबर कॅफेची मदत घेऊन ही पद्धत वापरात आणता येईल. त्यासाठीचे सर्व तपशील जिल्हाधिकारी कार्यालयातील संगणकीय पद्धतीचे प्रकल्प अधिकारी सईद कादरी यांनी उपस्थितांपुढे मांडले. अर्जाचा एकूण प्रवास, त्यातील निरनिराळे टप्पे, अर्जाची वैधता-अवैधता, शुल्क जमा करण्याची पद्धत, नि:शुल्क असल्यास बीपीएल कार्डचे तपशील पडताळण्याची जबाबदारी, उत्तर देण्यासाठीचा मार्ग (सॉफ्ट कॉपी, डाकेने की प्रत्यक्ष), अर्ज नाकारण्याची स्थिती, कारवाईला वेळ लागत असल्यास स्टेटसचे अपडेशन, असे सर्व तपशील त्यांच्या पीपीटी प्रेझेंटेशनमधून स्पष्ट झाले.

प्रारंभी उपायुक्त विनायक औगड चंदन पाटील यांनी शब्दरूपाने, तर जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सईद कादरी यांचे स्वागत केले. या वेळी नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कांबळे, नगरसचिव मदन तांबेकर, लेखा परीक्षक प्रिया तेलकुंटे, लेखाधिकारी प्रेमदास राठोड, विधी अधिकारी श्रीकांत चौहान, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नेताम, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, अग्निशमन अधिकारी भरत चौहान, शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, शहर अभियंता जीवन सदार, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, प्रणाली घोंगे, योगेश पीठे प्रवीण इंगोले, करमूल्यांकन अधिकारी महेश देशमुख, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे, सचिन पोपटकर, सहायक क्षेत्रीय अधिकारी ज्ञानेश्वर अलुडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता रवींद्र पवार, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रतिभा घंटेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढेकाय होणार? : आरटीआयऑनलाइन झाल्यामुळे माहिती अधिकार कायद्याचा वापर करणाऱ्यांवर येणारे सामाजिक दडपण नष्ट होईल. बरेचदा अशा कार्यकर्त्यांचा पाठलाग करून त्यांना त्रास देण्याचा प्रकार केला जायचा. आता ही प्रकिया ऑनलाइन झाल्याने कोणी, केव्हा कोणती माहिती विचारली, हे सहसा कळणे कठीण होणार आहे.

आमची यंत्रणा सुसज्ज
माहितीचाअधिकारऑनलाइन झाल्यामुळे माझ्यासह मनपातील सर्व अपिलीय अधिकारी, विभागप्रमुख(जनमाहिती अधिकारी) सहायक जनमाहिती अधिकारी यांचे र्इ-मेल युजर आयडी तयार केले अाहे. िशवाय यासंबंधीची कामे हाताळण्यासाठी त्या सर्वांना प्रशिक्षितही करण्यात आले आहे. चंदन पाटील, नोडलऑफिसर, ऑनलाइन माहिती अधिकार, मनपा

आरटीआय गतिमान होणार
ऑनलाइनमुळे माहितीच्या अधिकार प्रक्रियेला कमालीची गती प्राप्त होणार आहे. शिवाय संबंधित अधिकारी आणि तक्रारदारांमध्ये उडणारे खटकेही थांबतील. संगणकाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले अाहे. आता थेट मोबाइलवरूनही इंटरनेट सुविधा प्राप्त होत असल्यामुळे आरटीआय ऑनलाइन केला जावा, अशी जुनीच मागणी होती. ती शासनाने अलीकडेच मान्य केली आहे.त्याचा निश्चितच फायदा होईल.