आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी निधी न दिल्यास विराेधी भूमिका : संभाजीराजे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - ‘जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी ३११ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु त्याचे पैसे कधी देणार? शासनाने दिलेला शब्द पाळावा नाही तर सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल,’ असा इशारा युवराज संभाजीराजे यांनी मंगळवारी युती सरकारला दिला. माँ जिजाऊ व शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. मंगळवारी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथील मातृतीर्थावर आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रतापराव जाधव, आमदार अर्जुन खोतकर, आमदार शशिकांत खेडेकर, रविकांत तुपकर, रेखाताई खेडेकर अादींची प्रमुख उपस्थिती हाेती. ‘नापिकी व कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांनो, तोट्यात जात असेल तर शेती करू नका, आपल्याला जमेल तो व्यवसाय करा. यापुढे गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता आपल्याला उभा करावा लागणार आहे. कारण राजसत्तेशिवाय कोणतेही काम होणे शक्य नाही. जोपर्यंत शेतकरी औद्योगिक शेती करत नाही तोपर्यंत प्रगती होणे शक्य नाही. आपल्याला हवे तेच पीक घ्या, मात्र आत्महत्या करू नका, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या बनवाव्यात. त्यांना ‘आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ असा दिलासा द्या. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये जर कोणी शेतकऱ्यांकडे वसुलीस आला तर त्याच्या तंगड्या तोडा, असे अावाहनही खेडेकर यांनी केले.

राैप्यमहाेत्सवी साेहळा तीन दिवसांचा
सन २०१८ या वर्षात जिजाऊ जन्मोत्सवाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने त्या वर्षीचा जन्मोत्सव तीन दिवसांचा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे पुरुषाेत्तम खेडेकर यांनी सांगितले. जगातील २७ देशांमध्ये जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात अाला आहे. येणारी शिवजयंती न्यूयाॅर्कमध्येसुद्धा साजरी करण्यात येणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले.
जिजाऊ जयंतीदिनी दारू दुकाने बंद ठेवा - खासदार सुप्रिया सुळे
यशवंतराव प्रतिष्ठानच्या वतीने मी सन २०११ मध्ये स्त्री भ्रूणहत्या रोखण्याविषयी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जनजागृती केली होती. ही माेहीम यापुढेही चालूच ठेवणार अाहे. तसेच जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी दारूची दुकाने बंद असावीत, या मागणीसाठीही अापण प्रशासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी दिली. राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन केल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बाेलत हाेत्या. ‘आमचे सरकार सत्तेवर असताना या ठिकाणी शिवसृष्टी उभारणीसाठी अजित पवारांनी प्राधिकरणाला तत्त्वत: मान्यता दिलेली आहे. तसेच नियाेजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला हाेता, परंतु आता या आराखड्याला वेळ लागत आहे. सर्व आमदार, खासदार व पत्रकारांनी त्यासाठी पाठपुरावा करायला हवा,’ असे सुळे म्हणाल्या.

बैलगाडीच्या शर्यतीला बंदीच्या निर्णयाबाबत सुळे म्हणाल्या, शर्यतीत बैलांना दुखापत होणार नाही, असे अामचे म्हणणे असून ते काेर्टासमाेर मांडून पर्याय काढण्याचा प्रयत्न करू. कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे. आपला अन्नदाता सुखी पाहिजे. तसेच धनगर समाजाला अारक्षण मिळाले पाहिजे,’ अशी अपेक्षाही सुळे यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...