आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाकडून 70 प्रशिक्षण वर्गांचे आयोजन, 19 हजार स्वयंसेवक सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी पात्रतेचे निकष लावण्याचे धोरण संघाने स्वीकारले असून संख्येऐवजी आता दर्जावर भर दिला जात आहे. मात्र, निकष लावूनही देशभरातील या वर्गांना मिळणारा प्रतिसाद वाढतच असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आला आहे.
 
प्रशिक्षित स्वयंसेवक कायमस्वरुपी संघाच्या कामातच असावा, स्वयंसेवकाला दिलेल्या प्रशिक्षणाचा संघाच्या कामात फायदा व्हावा, या उद्देशाने संघाने मागील काही वर्षापासून प्रशिक्षण वर्गांसाठी काही निकष लावले जात असल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिव्य मराठी शी बोलताना दिली. प्रथम वर्ष प्रशिक्षणासाठी शाखेत कुठलीतरी जबाबदारी असलेल्या स्वयंसेवकाची निवड केली जाते. द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी एकापेक्षा जास्त शाखांची जबाबदारी असलेल्या स्वयंसेवकांची अथवा भविष्यात तशी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असलेल्या स्वयंसेवकाची निवड केली जात आहे. तर तृतीय व अंतिम वर्षाच्या प्रशिक्षणासाठी संघाची जिल्हास्तरावरील जबाबदारी अथवा तशी जबाबदारी मिळण्याची शक्यता असलेल्या स्वयंसेवकाला पात्र ठरविले जाते.

या उन्हाळ्यात देशात ७० ठिकाणांवर संघाच्या वर्गांचे आयोजन होत असून त्यात १९ हजार स्वयंसेवक सहभागी झाल्याची माहिती देताना निकष लावूनही वर्गांना मिळणारा प्रतिसाद वाढतच असल्याचा दावा मनमोहन वैद्य यांनी केला. दरवर्षी संघाच्या ४२ प्रांतांमध्ये प्रथम वर्षाच्या ५५ वर्गांचे आयोजन केले जाते. त्यात १५ हजार स्वयंसेवक सहभागी होतात. ११ क्षेत्र स्तरावर १४ वर्ग आयोजित केले जातात. त्यात तीन हजार स्वयंसेवक सहभागी होतात. दक्षिण भारत, पूर्वेतील राज्यात भाषेच्या अडचणीमुळे तीन वर्ग अधिकचे आयोजित होतात. तृतीय, अंतिम वर्षाचा अ. भा. वर्ग नागपुरात रेशीमबाग येथे आयोजित केला जातो.

दरवर्षी या वर्गात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या साडेसातशे ते आठशे च्या घरात असते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या वर्गात ९१४ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. प्रत्येक प्रांताच्या कोट्यानुसार राज्यांमधून सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या निश्चित केल्याचे वैद्य यांनी सांगितले. याशिवाय संघातर्फे दरवर्षी १४ ते ४० या वयोगटासाठी सात दिवसांच्या प्राथमिक शिक्षा वर्गाचे आयोजन होत असून त्यात एक लाख स्वयंसेवक सहभागी होतात. मात्र, या वर्गांसाठीही येत्या काळात निकष लावून संख्येवर मर्यादा आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम वर्षात सहभागी होण्यासाठी हा वर्ग आवश्यक असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले. अगदीच नवख्या स्वयंसेवकांसाठी तीन वर्षांपासून संघाने संघ परिचय वर्ग सुरु केले आहेत. संघाचे वाढते आकर्षण हेच प्रतिसाद वाढीमागील कारण अाहे, असा दावा  वैद्य यांनी  केला  आहे.
 
बातम्या आणखी आहेत...