आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर, संजय राठोड यांनी दिला विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- निसर्गाच्याअवकृपेमुळे शेतकऱ्यांवर सातत्याने विविध प्रकारची संकटे कोसळत आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे दुष्काळ किंवा गारपिटीमुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई उपलब्ध करून दिली आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ध्वजारोहण केल्यानंतर शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनापुढील फार मोठे आव्हान आहे. आत्महत्या थांबवण्यासाठी विशेष पथदर्शी कार्यक्रमांसह विविध प्रकारे प्रयत्न केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये. शासनाने एपीएलच्या शिधापत्रिकाधारकांनाही स्वस्त दरातील धान्य देणे, धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम, तसेच जीवनदायी आरोग्य योजनेसाठी उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिकांना या तीनही बाबींचा लाभ मिळणार आहे. केवळ जिल्ह्यासाठी शासनाने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केली. त्यामुळे एक एकर क्षेत्राचेही खरेदी - विक्रीचे व्यवहार जिल्ह्यात होणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या विहिरींची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी दुष्काळ होता. शेतकऱ्यांची पीक कर्ज भरण्याची परिस्थिती नव्हती. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन करून देण्यात आले आहे. पाच वर्षांत पाच हप्त्यात शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचे कर्ज भरता येईल. या कर्जावरील व्याजही शासन भरणार आहे. हा मोठा दिलासा असल्याचे पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले. या वेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पोलिस विभागाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमास आमदार मदन येरावार, माजी खासदार सदाशिव ठाकरे, माजी आमदार नंदिनी पारवेकर तसेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भविष्यात टंचाईग्रस्त गावे राहणार नाही
सर्वसामान्यांनासेवेची हमी देणारा सेवा हमी कायदा राज्यात लागू झाला आहे. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानातून प्रत्येक गावात संरक्षित सिंचनासह पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात एकही गाव भविष्यात टंचाईग्रस्त राहणार नसून, नागरिकांनीही अभियानात सहभाग द्यावा. संजयराठोड, पालकमंत्री.

नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप लवकरच
गेल्यावर्षी दुष्काळ गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी २६० कोटी रुपये जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. त्यापैकी २५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित वाटप जलदगतीने सुरू आहे. या वर्षी निसर्गाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चांगली आहे. निसर्गाने शेतकऱ्यांना अशीच साथ द्यावी, अशी प्रार्थनाही केली.
आत्महत्या रोखण्यावर भर : सध्यातरीयवतमाळ जिल्ह्यामध्ये होणाऱ्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यावर शासनावर भर राहणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या मनामध्ये शासनाविषयी आत्मविषय निर्माण करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यातून चांगले निष्पन्न होत आहे. आणखी काही काळ गेल्यानंतर याचे चांगले परिणाम दिसून येतील.
विहिरींना मुदतवाढीचा दिलासा : धडकसिंचन विहिरींना शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपूर्ण ७५८ विहिरी पूर्ण होणार आहेत. धडक सिंचनमधून नरेगात वर्ग केलेल्या विहिरी पुन्हा धडक सिंचनमध्ये वर्ग करण्यात आल्या आहेत. तसेच सौरपंपाची योजना राबवली जाणार असल्याने या योजनांचाही शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

भारताचा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बोलताना पालकमंत्री संजय राठोड, उपस्थित जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, सीइओ डॉ. कलशेट्टी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग इतर विभागाचे अधिकारी. तर डॉ. नंदुरकर विद्यालयात स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात साई विद्यानिकेतनच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांची अशी आकर्षक वेशभूषा साकारली होती.