आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरसंघचालक अचानक गडकरी यांच्या वाड्यावर, पावणेदोन तास चर्चा, इतरांना प्रवेश नव्हता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शनिवारी रात्री अचानक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या वाड्यावर जाऊन भेट घेतली. तिघांमध्ये जवळपास पावणेदोन तास एकांतात चर्चा झाली. बैठक सुरू असलेल्या माळ्यावर कोणालाही प्रवेश नव्हता. संघनेत्यांच्या गडकरीवाड्यावरील भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास दोन्ही नेते गडकरीवाड्यावर पोहोचले. या बैठकीबद्दल कमालीची गुप्तता बाळगली जात असल्याचे दिसून आले. काही महत्त्वाचे बोलायचे असल्यास भाजपचे नेते संघ मुख्यालयात जाऊन भागवत आणि जोशी यांच्याशी चर्चा करतात. हा आजवरचा पायंडा मोडून डॉ. भागवत व जोशी गडकरी यांना भेटायला वाड्यावर आले होते. त्यामुळे संघनेत्यांची गडकरी वाड्यावरील बैठक राजकीय दृष्टीकोनातून अतिशय उत्सुकतेचा विषय ठरली. केंद्रात परिवहन खात्याचे मंत्री असलेल्या गडकरी यांना काम करू दिले जात नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी चंद्रपूरमध्ये केला होता. याबद्दल स्पष्टीकरण विचारले असता स्वामी यांनी खुबीने बगल दिली होती. गडकरी यांची मंत्रीमंडळात कोंडी केली जात असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली कारभाराची चर्चाही संघ परिवारात जोरात सुरू आहे. त्यामुळे संघाचे प्रमुख आणि गडकरी यांच्या भेटीला ही पार्श्वभूमी कारणीभूत आहे की कसे हे स्पष्ट झाले नसले तरी परिवार आणि सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मात्र या घडामोडींवरून मिळत आहेत.