आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमराजाच्या दारातून घडते "सरस्वती' दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवदा - शाळेत विद्यार्जनासाठी जाणारे विद्यार्थी मुक्त मनाने जातात, परंतु शाळेची शिकस्त झालेली इमारत पाहून शिक्षक पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते, परंतु प्रशासनाला त्याचे काय? सांगळूद येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारातूनच विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. शिक्षणाचा दर्जा सुधारावा विद्यार्थ्यांना सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात, परंतु काही अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे मात्र शिक्षणाचा खेळखंडोबा होतो, तर कुठे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला जातो. दर्यापूर तालुक्यातील सांगळूद येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा या उदासीन धाेरणाचे बोलके उदाहरण आहे.

१९०६ मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीने शंभरी पूर्ण केली आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत सहा शिक्षक असून, १३६ पटसंख्या आहे. ही इमारत शिकस्त झाली असून, जागोजागी तिचे प्लास्टर उखडलेले आहे. कवेलू पडलेले आहेत. इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत. दरवाजांच्या चौकटांचे सिमेंट गळून पडले आहे, अशा इमारतीत २०१० पर्यंत अध्यापनाचे कार्य चालायचे. विद्यार्थ्यांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेता २००९ मध्ये नवीन इमारतीच्या कामाला प्रारंभ झाला. वर्षभरात इमारतीचे बांधकाम होऊन नवीन इमारतीत अध्यापनकार्याला सुरुवातही करण्यात आली. मात्र, शंभर वर्षे जुनी इमारत ज्या अवस्थेत पाच वर्षांपूर्वी होती, तीच अवस्था आजही कायम आहे. ती अद्यापही पाडण्यात आलेली नाही. ही इमारत विद्यार्थी शिक्षकांसाठी धोकादायक ठरू लागली आहे. विशेष म्हणजे नवीन इमारतीत जाण्याचा रस्ता जुन्या शाळेच्या इमारतीतून जातो. ही इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आली आहे. दुपारच्या सुटीत मुले याच इमारतीत खेळतात. बरेचदा शिकस्त झालेल्या इमारतीच्या विटा पडल्याने विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती शिक्षकांनी दिली. मुख्याध्यापिका पुष्पा थोपत यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्यांची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. या गंभीर बाबीमुळे विद्यार्थी, शिक्षक पालक नेहमीच दडपणाखाली असतात. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होऊन विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहतेय का, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.

प्रस्ताव पडलाय धूळ खात : २०१३पासून शिकस्त झालेली इमारत पाडण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला वारंवार निवेदनं प्रस्ताव देण्यात आले आहेत. या विषयाला अनुसरून ग्रामपंचायतीचे ठरावही घेण्यात आले, परंतु त्याचा अद्यापही उपयोग झाला नसून, शाळेची शिकस्त इमारत पाडण्याचा प्रस्ताव धूूळ खात पडला आहे.

माहिती मिळालीच नाही : दर्यापूरपंचायत समितीचे बीडीओ अरविंद गुडधे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, याबाबत बीओ साहेबांसाेबत चर्चा करून तुम्हाला दहा मिनिटांमध्ये कळवतो, असे सांगितले, परंतु त्यांचा कुठलाही फोन आला नाही, किंवा त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. याबाबत त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असता, त्यांनी नंतर फोन उचलणे बंद केले.

अद्यापही घेतली नाही दखल : शिकस्तझालेल्या जुन्या शाळेच्या इमारतीच्या खोल्या पाडण्यासंदर्भात २०१३ पासून वारंवार पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे निवेदनं देण्यात आलीत, परंतु अद्यापही त्याची कुणी दखल घेतली नाही,असे प्रभारी मुख्याध्यापिका
पुष्पा भोपत यांनी सांगितले.

खेळण्यासमैदान तयार होऊ शकते : इतरदिवसांमध्ये तर इमारतीची भीती विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांनाही असते, परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वांनाच या इमारतीमधून ये-जा करताना जीवात जीव नसतो. इमारत पाडल्यास मुलांना खेळण्यास मैदान तयार होऊ शकते,असे मत शिक्षक
विशाल काळे यांनी व्यक्त केले.

जीवटांगणीला लागला : नवीनइमारतीत मुले विद्यार्जन करत आहेत, ही आनंदाची बाब आहे, परंतु त्याच वेळी जुनी इमारत डोळ्यांसमोर आली की, मनाची घालमेल होऊ लागते. पालकांचा जीव टांगणीला लागतो,असे कैलास गावंडे यांनी सांगितले.

ठराव पाठवला :या शाळेचीजुनी इमारत पाडण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेऊन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सादर केले. ग्रामपंचायतीकडून कुठलीही अडचण नाही, परंतु प्रशासकीय यंत्रणेकडूनच याची दखल घेतल्या जात नाही,असे सरपंच मंजूषा नवलकर यांनी सांगितले.