आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील दुसऱ्या जिल्हा स्टेडियमला मिळाली मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -  क्रीडानगरी अशी ख्याती असलेल्या अंबानगरीत लवकरच दुसरे जिल्हा क्रीडा संकुल साकारणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोरील २८ हजार चौरस फुट जागेवर उभारल्या जाणाऱ्या या क्रीडा स्टेडियमला मान्यता दिल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटेही या स्टेडियमसाठी प्रयत्न करीत असल्यामुळे येत्या काही महिन्यात अंबानगरीत दुसऱ्या जिल्हा स्टेडियमचे स्वप्न साकारणार आहे. राज्य क्रीडा परिषदेच्या बैठकीत या मुद्यावर प्राथमिकतेने चर्चा होणार अाहे. 
 
विशेष बाब अशी की, ज्या सुविधा सध्या अस्तित्वात असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात नाहीत त्याच या नव्या जिल्हा क्रीडा संकुलात असणार आहेत. अमरावतीत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू घडत असतात. परंतु, त्यांना नियमित सराव करण्यासाठी कोणतेही केंद्र शहरात उपलब्ध नसल्यामुळे पैसे खर्च करून मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, लुधियाना या ठिकाणी जावे लागते. नेमकी हीच बाब हेरून नव्या जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचा सुविधा खेळाडूंना मिळतील, असे प्रयत्न केला जाणार आहे. नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे शहराचे आमदार डाॅ. सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात पत्र दिले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चाही झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या जिल्हा स्टेडियमला होकार दिला. 

तसा तर या संकुलाबाबत प्रस्ताव जिल्हा क्रीडा समितीतर्फे आधीच राज्याच्या क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. आता वाट आहे ती केवळ शासनाकडून रितसर मंजुरी निधी मिळण्याची.शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोटी रु. खर्चून नागपूरच्या धरतीवर दुसरे जिल्हा क्रीडा स्टेडियम अमरावतीतही उभे राहील. 

राज्य क्रीडा परिषदेच्या बैठकीत स्टेडियमचा प्रस्ताव राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्यापुढे मांडला जाणार आहे. ते राज्य क्रीडा परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीत सकारात्मक पद्धतीने प्रस्ताव मांडून मंजुर करून घेण्याकडे आमचा कल असेल, असे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गत काही वर्षांपासून अमरावती येथे असलेले जिल्हा क्रीडा स्टेडियम हे केवळ नावालाच असून येथे शासकीय समारंभांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्रीडा स्पर्धा होत नाहीत. राज्य शालेय क्रीडा स्पर्धेशिवाय अन्य कोणतेही मोठे आयोजन सुविधांच्या अभावामुळे येथे शक्य नाही. अगदी अॅथलेटिक्स स्पर्धाही आयोजित करायच्या म्हटले की, उत्तम सोयी नाहीत. त्यामुळेच सुसज्जित क्रीडा स्टेिडयम असावे अशी मागणी जोर धरत होती. ती बघता स्थानिक नेते, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासह विविध क्रीडा संघटना, संघटक आणि क्रीडाप्रेमीही शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडा संकुल मिळावे यासाठी सामूिहक प्रयत्न चालविले होते. या सामूहिक प्रयत्नांना यश मिळणार अशी आशा मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्यानंतर बळावली आहे. 

अंबानगरीचे नाव झळकणार 
^दुसरे क्रीडा स्टेडियम शहरात उभे राहिले तर धनुर्विद्या, सायकलींग, ज्युदो यासारख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा मिळतील. त्यामुळे अंबानगरीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे. शहरात दुसऱ्या स्टेडियमची आवश्यकता पाहून मुख्यमंत्र्यांनी लगेच मंजुरी दिली आहे. किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती. 

धनुर्विद्या रेंज, व्हेलोड्रोम वैशिष्ट्य 
अमरावती हे शहर धनुर्धरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असले तरी येथे अजूनही अत्याधुनिक आर्चरी रेंज निर्माण होऊ शकले नाही. त्यामुळे नव्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी रेंज उभारले जाणार आहे. त्यांच्यासाठी व्हेलोड्रोम, ज्युदो हाॅल आणि विविध खेळांच्या सुविधा येथे राहणार आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून दिली जागा 
अमरावती विद्यापीठापुढील जागा ही प्रबोधिनीसाठी शासनाकडून मिळाली होती. परंतु, प्रबोधिनीला शासनाने अनुदान देणे बंद केले आहे. त्यामुळे ही जागा तशीच पडून होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा जिल्हा क्रीडा संकुलासाठी सुमार दोन महिने आधीच डीएसओ कार्यालयाला उपलब्ध करून दिली आहे.