आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेव्हरटेकच्या नादात दाेन दुचाकींचा अपघात, सात ठार, पुसद जवळची घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - लग्नावरून घरी परत येताना दाेन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सात जण ठार झाल्याची घटना बुधवार, २० एप्रिलला दुपारच्या सुमारास पुसद ते शेलू रस्त्यावरील साई मंदिराजवळ घडली. यापैकी एका दुचाकीवर चार जण तर दुसर्या दुचाकीवर तीन जण स्वार होते. या प्रकाराने तालुक्यातील हर्षी, चिलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच आमदार मनोहरराव नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले.

या अपघातात शेषराव नारायण काळे (वय ४५), युवराज तुकाराम गुहाडे (वय २२), बाळू तुकाराम गुहाडे (वय २८), यादव साहेबराव ठाकरे (वय २२), सर्व राहणार हर्षी. विलास राजाराम काळे (वय २०), खंडू सखाराम तांबारे (वय २५), रवी नारायण कऱ्हाळे तिघेही राहणार चिलवाडी अशी मृतकांची नावे आहेत. बोरनगर येथील रहिवासी मंगल नेमीचंद आडे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच २९ व्ही-४२६२ ला चालक विनोद नरसिंग राठोड (वय २३) रा. शेलू यांनी दुरुस्तीसाठी पुसद येथे आणले होते. दरम्यान दुरुस्ती आटोपताच राठोड यांनी परतीच्या मार्गाने प्रवास सुरू केला. त्याच वेळी त्यांच्यासमोरून एका दुचाकीवर तिघे जण स्वार होऊन चिलवाडी येथून पुसदकडे येत होते, तर ट्रॅक्टरच्या मागून चार जण दुचाकीवर स्वार होऊन हर्षीकडे जात होते. साई मंदिराजवळ येताच मागाहून येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील एक जण ट्रॅक्टरसमोर येऊन पडला. मात्र, ट्रॅक्टरचालक राठोड यांनी प्रसंगावधान साधून ब्रेक मारला, परंतु ट्रॉली उलटली. या दुर्घटनेत दोन्ही दुचाकीवरील पाच जण जागीच ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, याची माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. या घटनेतील दोन्ही जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, परंतु उपचार सुरू असतानाच एका जणाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्या जखमीला लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचीही उपचारादरम्यानच प्राणज्योत मालवली. दरम्यान, हा अपघात पॅशन दुचाकी क्रमांक एम. एच. २९ डब्ल्यू ६८५७ आणि स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम. एच. २९ एस. ८१४९ यांच्यात झाला. मात्र, कोणती दुचाकी कोणाची याची माहिती वृत्त लिहिपर्यंत मिळाली नव्हती. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक विनोद राठोड यांनी पुसद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार कुरळकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक धीरज चव्हाण करत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आमदार मनोहरराव नाईक यांचे अंगरक्षक अशोक तडसे, वसंत खंदारे यांनी पोलिसांना माहिती देताच शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार कुरळकर, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण हे चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे क्यूआरटी जवानासह नागरिकांनी पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेची माहिती मिळताच आमदार मनोहरराव नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. या घटनेनंतर हर्षी, चिलवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

ट्रॅक्टरचालकाचे प्रसंगावधानही निष्फळ
ट्रॅक्टरच्या पुढे जाताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली असता, एक जण ट्रॅक्टरच्या समोर येऊन पडला. त्यात चालकाने प्रसंगावधान साधून ब्रेक लावला, त्यात ट्रॉली दुसऱ्या बाजूने उलटली. मात्र, ब्रेक दाबून ज्या युवकाचा जीव चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला त्या युवकाची प्राणज्योत शेवटी मालवली. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाचे प्रसंगावधानही या ठिकाणी निष्फळच ठरल्याचे दिसून येते.

फोटो काढण्यातच व्यस्त
अपघात घडल्यानंतर पाच जण जागेवर मृत्युमुखी पडले. यातील दोघे गंभीर जखमी होते, अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या बहुतांश नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून अपघातग्रस्तांची मदत केली नाही, उलट त्या अपघाताचेच फोटो काढण्यात सर्वजण व्यस्त होते.