आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मारून कार्पोरेट शेती उभारायची आहे, शंकरअण्णा धोंडगे यांची सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाभुळगाव- महाराष्ट्रासह केंद्रातील सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. व्यापारीधार्जिणे असलेले हे सरकार खऱ्या शेतकऱ्यांना मारून कार्पोरेट शेती उभारू पाहत आहे. आज शेतकरी वैतागला असून त्याच्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये, अन्यथा परिणाम फार गंभीर होतील, असा इशारा किसान मंचचे निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी दिला. ते शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी स्थानिक विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

या वेळी आमदार ख्वाजा बेग, कार्यकारी समिती सदस्य किशोर माथनकर, दत्ता पवार, महासचिव कैलास काळे, माजी आमदार डॉ. वसंतराव बोंडे, हरीश कुडे, किसान मंचचे नागपूर निमंत्रक राजू राऊत, अशोकराव घारफळकर उपस्थित होते. किसान मंचच्या शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियानानिमित्त बाभुळगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. त्यापूर्वी किसान मंचद्वारे पत्रकार परिषद घेण्यात आली. 

शंकर अण्णा धोंडगे पुढे म्हणाले की, सरकारचे मत शेतकऱ्यांविषयी सकारात्मक नाही. आपल्या देशात अन्न सुरक्षा आहे. मात्र शेतकरी सुरक्षेसाठी एकही कायदा अस्तित्वात नाही. आज शेती व्यवसाय सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच अडचणीत सापडला आहे. आजही राज्याचे प्रमुख अत्यंत बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. किसान मंच ऑगस्टपासून शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियान राबवत आहे. त्या अनुषंगाने सेवाग्राम ते नाशिक असा ३० जिल्ह्यात ५५ दिवस प्रवास करणार आहे. अभियानाचा समारोप ऑक्टोबर रोजी नाशिक येथे होईल. या वेळी सुकाणू समिती आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणार आहे, अशी माहिती धोंडगे यांनी दिली. आमदार ख्वाजा बेग यांना विरोधी पक्ष म्हणून आपली बाजू कमजोर पडत आहे काय? असे विचारले असता, ते म्हणाले की, विरोधक म्हणून आम्ही कदापि कमजोर नाही. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सरकारने जनतेची शेतकऱ्यांची दिशाभूल केली. विरोधकांचे काम चोखपणे सुरू आहे. आता पुढे काय-काय होते याकडे लक्ष द्यावे. या वेळी उपस्थित किसान मंच सदस्यांनी अनेक बाबींवर चर्चा केली. त्यानंतर सर्व मंडळी स्थानिक शिवशक्ती मंगल कार्यालयात आयोजित किसान मेळाव्यासाठी निघून गेली. पत्रकार परिषदेत पंचायत समिती माजी सभापती प्रवीण खेवले, खरेदी विक्री अध्यक्ष श्रीकांत कापसे, प्रशांत वानखडे, रमेश मोते, दिनकर कोंबे, अशोक भोंगे आदी उपस्थित होते. 

आर्णी: शेतकरी-शेतमजूरांच्यान्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असून, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार असल्याची माहिती माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्णी येथे सकाळी ११ वाजता शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियानाचे आगमन झाले. या वेळी शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन अभियान संदर्भातील माहिती देऊन माध्यमाच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला. या वेळी रामेश्वर चौधरी, विश्वजीत डेरे यांच्यासह तालुक्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विश्रामगृहावर उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...