आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Commented On Drought Situation In Marathawada

शेतकरी समुपदेशनाचे सरकारचे कार्य समाधानकारक, पवार यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘मराठवाड्यात आजही भीषण दुष्काळी स्थिती आहे. जायकवाडी, मांजरा यासह इतर धरणांनी तळ गाठला असून जेमतेम जानेवारीपर्यंतच तहान भागवू शकेल इतके पाणी या भागातील धरणात आहे. या भागातील दुष्काळग्रस्तांच्या समस्या आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कानी घातल्या आहेत. मात्र दुष्काळग्रस्तांच्या समस्यांकडे हे सरकार फारसे गांभीर्याने पाहत नाही,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी केला. मात्र शेतकरी आत्महत्या रेाखण्यासाठी हे सरकार करत असलेले समुपदेशनाचे काम समाधानकारक आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांनी मंगळवारी उपराजधानीतील काही निवडक ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारच्या कारभाराविषयी ते म्हणाले, ‘देशभरातील जनतेची अपेक्षापूर्ती करण्यात मोदी सरकार निश्चितच अपयशी ठरले आहे. कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळवून देण्यात हे सरकार कमी पडले आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात कापसाला मिळत असलेला पाच हजार रुपयांपर्यंतचा भाव आता ३९०० रुपयांवर घसरला आहे. उसाचे दरही ३५०० रुपयांवरून २२०० रुपयांवर आले आहेत,’ असा आरोपही पवारांनी केला.
‘वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही भूमिकेवर ठाम आहे. जर येथील जनतेला वेगळे राज्य हवे असेल तर राष्ट्रवादी त्याला विरोध करणार नाही. आता सत्ताधारी भाजपने स्वतंत्र राज्याचा प्रस्ताव आणावा,’ अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.
बिहार निवडणुकीत नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांनी समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या आघाडीत घेतले असते तर धर्मनिरपेक्ष पक्षांची ही आघाडी भाजपला चांगली लढत देऊ शकली असती. मात्र तरीही अाम्ही स्वबळावर लढत आहोत, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.
‘यूपीए सरकारच्या काळातही संसदेत विरोधक गोधळ करायचे. मात्र त्यावेळी अामच्याकडे प्रणव मुखर्जी यांच्यासारखे सक्षम सभागृह नेते होते. आज मात्र माेदी सरकारकडे विरोधकांना तोंड देऊ शकेल, असा सक्षम नेता दिसत नाही. या सरकारमध्ये एकसंघतेचा अभावही दिसतो,’ अशी टिप्पणीही पवारांनी केली.

कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही आम्ही अपयशी
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी यूपीए सरकारने तब्बल ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र तरीही आत्महत्या रोखण्यात तत्कालीन केंद्र सरकारला यश आले नाही. सध्या राज्य सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे सुरू केलेले समुपदेशन ही समाधानकारक बाब असल्याचे सांगत पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे एकप्रकारे कौतुकच केले.