आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींचा दृष्टिकोन सर्वसमावेशक, षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त पवारांनी केले कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून घडलेल्या नेत्यांचा दृष्टिकोन विचार आणि कामापुरता मर्यादित असायचा. त्याला छेद देऊन सर्वसमावेशक दृष्टिकोन जोपासण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले,’ असे गाैरवाेद‌्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी सत्कार साेहळ्यात काढले.  
 
षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. या वेळी पवार यांच्यासह आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री विजय गोयल, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे  अादींची प्रमुख उपस्थिती हाेती. योगगुरू बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण, अभिनेता विवेक ओबेराय यांचीही उपस्थिती हाेती. याप्रसंगी नितीन गडकरी आणि पत्नी कांचन गडकरी यांचा सन्मानपत्र तसेच एक कोटी १ लाखाचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. हा निधी गडकरी यांनी सामाजिक संस्थांना दिला.
 
‘विकासाचा ध्यास घेतलेला नेता’ असा गडकरी यांचा उल्लेख करून पवार म्हणाले, ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे काम, मुंबईतील उड्डाणपूल योग्य वेळेत व योग्य किमतीत बांधून दाखविणारे गडकरी हे प्रभावी प्रशासक आहेत. संसदेत वावरताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि गडकरी यांच्या कामांची चर्चा सुरू असते.  आम्ही निवडणुकीत वेगळी भूमिका घेत असतो. वैचारिक मतभेद असू शकतात. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येणे हीच महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली असून ती गडकरी उत्तमपणे पार पाडत आहेत.’   
 
मुख्यमंत्री असताना गडकरी यांनी मला बरेच छळले, असा उल्लेख करून सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, ‘गडकरींनी प्रसंगी काँग्रेसच्या लोकांनाही सोबत घेऊन सरकारकडून निधी मिळवला.  सर्वच पक्षांच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धती अनोखी आहे. गडकरी यांचे कार्य लक्षात घेता त्यांना आणखी मोठे पद मिळायला हवे होते.’ मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  गडकरी हे जबरदस्त आत्मविश्वास असलेले व्यक्तिमत्त्व अाहेत. केंद्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहेत. त्यांच्या नेतृत्वात राज्याला सर्वाधिक प्रकल्प मिळत आहेत याचा अभिमान वाटतो.’  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  काव्यात्मक शैलीत गडकरींचे काैतुक केले.

देशात पैशाची नव्हे, काम करणाऱ्यांची कमतरता   
आपल्या देशात पैशाची नाही, तर काम करणाऱ्यांची कमतरता अाहे. आयुष्यात आपण कुठल्याही पदाची लालसा बाळगली नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना संघ आणि विद्यार्थी परिषदेने दिलेले संस्कार कामी आले. पक्षाच्या भिंती तोडून सर्वांशी सलोख्याचे सबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही विकासाच्या कामात राजकारण आणले नाही. त्यामुळे दिल्लीतही मला सर्वांचे प्रेम मिळत आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वसमावेशक परंपरा निर्माण केली. सर्वांसाठी काम करणे हीच महाराष्ट्राची संस्कृती अाहे.  
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
बातम्या आणखी आहेत...