आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित कोण हे समजून घ्यावे, शरद पवारांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘मराठा समाजाला अारक्षण देण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्थापित कोण अन् विस्थापित कोण? हे आधी समजून घ्यावे. आपल्या हिताची जपणूक करणारे सरकार नसल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. राज्य सरकारची प्रश्न सोडविण्याची भूमिकाच नाही’, या शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला गुरुवारी प्रत्त्युत्तर दिले.

अागामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विदर्भातील निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी नागपुरात अायाेजित राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बाेलत हाेते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग हे नेते प्रामुख्याने उपस्थित होते. सध्या राज्यभरात निघत असलेल्या मराठा मोर्चांचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘राज्यात निघणारे माेर्चे भाजपविराेधात नसून अाघाडी सरकारमधील प्रस्थापितांविराेधात अाहेत,’ असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केले हाेते. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित आणि विस्थापित कोण हे समजून घ्यावे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात स्थिरता असते. त्यामुळे तेच केवळ प्रस्थापित असतात. राजकीय पक्षांना दर पाच वर्षांनी लोकांपुढे जावे लागते,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

राज्य सरकारची प्रश्न सोडविण्याची भूमिकाच नाही असे नमूद करताना पवार म्हणाले की ‘आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर देता येत नाही असे सांगितले जाते. तामिळनाडू राज्यात आरक्षणाची टक्केवारी ७५ टक्क्यांवर गेली आहे. आम्हाला कोणाच्या हिस्स्याचे अारक्षण नकोय. इतर समाजातील गरीब घटकांचीही जपणूक करा. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारची चर्चा करावी’, असा सल्लाही त्यांनी दिला. मराठा समाजाकडे शिक्षण संस्था असल्याची टीका होते. प्रत्यक्षात कोणाकडे किती संस्था आहेत, हे मोजण्याची गरज आहे. विनाअनुदानित संस्थांचा पुनर्विचार व्हावा, असेही ते म्हणाले.

‘काेपर्डीतील आरोपींवर महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा सरकारने केली होती. आज तीन महिने होऊनही ते झाल्याने लोकांच्या मनात संताप आहे. अॅट्रॉसिटी कायद्याचे जतन होण्याची गरज आहे. मात्र, त्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे’, असेही पवार म्हणाले.

वाढदिवस नागपुरात
दरम्यान,यंदा शरद पवार यांचा १२ डिसेंबर राेजी वाढदिवस या वेळी नागपुरातच साजरा केला जाणार असून ११ डिसेंबरला शेतकरी मेळावा, १२ डिसेंबरला तज्ज्ञांचा परिसंवाद हाेणार अाहे. तसेच हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या जिवावर विकास नको
राज्य सरकारच्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात शेतकरी उद्ध्वस्त करून विकास होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांना भागीदार करून घेण्याचे आश्वासन हे लबाडाच्या घरचे आवतन असल्याची टीका पवारांनी केली. शेतकऱ्यांना राेख नुकसान भरपाई आणि विकसित जमीन देणार असाल तरच शेतकरी जागा देतील. अन्यथा राष्ट्रवादीच्या नेतृत्वात ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही पवारांनी दिला. राज्यात शेतकरी नैराश्यात आहे. कांदा धान उत्पादकांना दिलासा नाही. सरकारने कुठलेही आश्वासन पाळले नाही, असेही पवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...