आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळ्याची चौकशी न्याय्य पद्धतीने नाही, शरद पवार यांचा भाजप सरकारवर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- घोटाळ्यांच्या आरोपांवर राज्य सरकारकडून न्याय्य पद्धतीने चौकशी होत नसल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी नागपुरात केला. तसेच महाराष्ट्र सदन बांधकामातील अनियमितताप्रकरणी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची पाठराखणही केली.

दिल्लीत असे उत्तम बांधकाम कुठेही झाले नसताना त्याचे कौतुक, करणे सोडून भलत्या गोष्टी काढल्या जात आहेत. राज्यात चौकशीच्या अशा मार्गाने कधीही कोणी गेले नव्हते, अशी टीकाही पवारांनी पत्रकार परिषदेत केली. अडचणीच्या अनेक प्रश्नांना मात्र खुबीने बगल दिली.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे ती आपण मागणार नाही. मात्र, अतिशय गंभीर परिस्थिती असलेल्या भागात कर्जमाफी देण्याचा वेगळा विचार व्हावा, असे मत पवारांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर मांडले.

आत्महत्यांचे राजकारण नको
शेतीची समस्या पूर्वापार आहे. त्यामुळे आमच्या सत्ताकाळात आम्ही काय केले, यावर मला कुठलेही समर्थन द्यायचे नाही. कोणाच्या सत्ताकाळात किती आत्महत्या झाल्या, यावरही राजकारण करायचे नाही, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी देशात असतील तेव्हाच त्यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू शकेन, असा टोलाही पवारांनी लगावला.

आरक्षणाच्या प्रश्नावर समाजात कटुता वाढेल असे वक्तव्य जबाबदार मानल्या जाणाऱ्या लोकांनी तरी करू नये, असे मत पवार यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना व्यक्त केले.
होय, दुष्काळ, भूकंप, अवर्षण माझ्यामुळेच
राज्यातील दुष्काळाला पवार जबाबदार असल्याच्या बाळासाहेब विखे पाटील यांच्या आरोपावर पवार यांनी दुष्काळासाठी, भूकंपासाठी तसेच पाऊस न पडण्यासाठी मीच जबाबदार असल्याचे उपहासात्मक उत्तर दिले.