आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वामिनाथन’च्या शिफारशींना शेतकरी संघटनेकडूनच विरोध, अांदाेलनाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्यभर पेटलेल्या शेतकरी अांदाेलनात स्वामिनाथन अायाेगाच्या शिफारशींची अाग्रही मागणी हाेत असताना शरद जाेशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने साेमवारी नागपुरातील बैठकीत मात्र या शिफारशींनाच विराेध केला. त्याएेवजी शरद जोशी यांच्या टास्क फोर्सच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच ‘राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून संपूर्ण कर्जमुक्तीसाठी यापुढे आंदोलन करण्यात येईल,’ असा इशाराही संघटनेने दिला अाहे.  

शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक सोमवारी नागपुरात झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, ‘स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी शेतकरी हिताची नाही. त्यामुळे या शिफारशींना आमचा विरोध राहणार असून त्याऐवजी शरद जोशी यांच्या टास्क फोर्सच्या अहवालाची अंमलबजावणी केल्यास शेतमालास योग्य दर मिळतील, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी नको, असे त्यांनी  जाहीर केले.    

राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी लादण्यात आलेल्या सर्व अटी काढून टाकून संपूर्ण कर्जमाफी व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी एक ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या कळवल्या जाणार आहेत. ३ सप्टेंबरला शरद जोशी यांच्या जयंतीदिनी शेतकरी एक दिवसाचे उपवास आंदोलन करणार आहेत. त्यानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले जाईल, असे चटप यांनी सांगितले.   

याशिवाय शेतमालाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची लूट कशी होत आहे, याचा लेखाजोखा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मोबाइल फोनवर उपलब्ध करण्याचा निर्णयही शेतकरी संघटनेने जाहीर केला. शेतमालाचे भाव पाडण्याचे प्रयत्न सरकारने बंद करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले, विद्यमान अध्यक्ष अनिल धनवट, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, विदर्भ प्रदेश अध्यक्ष मदन कांबळे या वेळी उपस्थित होते. 

सत्ताधाऱ्यांना गावबंदी   
मंगळवारपासून राज्यात सत्ताधारी नेत्यांना गावबंदी करू, त्यांच्या सभा, बैठका होऊ दिल्या जाणार नाहीत, असे शेतकरी संघटनेने सांगितले. सत्ताधाऱ्यांत भाजपसह शिवसेना, रासप, स्वाभिमानी संघटना या साऱ्यांनाच समान न्याय लावला जाणार आहे. इतर पक्षांनी सत्तेत राहून शेतकऱ्यांची दिशाभूल चालवली असल्याचा आरोप चटप यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...