आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेसमोर सेनेचे ढोल ‘बजाओ’; जिल्हा मध्यवर्तीसह, स्टेट, लिड बँक सहकार विभागावर लावली नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- कर्जमाफीत संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा, दहा हजारापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे आणि कर्जमाफी झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या नावाची यादी बँकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात यावी या मागण्या घेवून आज, १० जुलै रोजी शिवसैनिकांनी ढोल वाजवा आंदोलन केले. यामध्ये प्रामुख्याने कर्जमाफीच्या निकषात बदल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह स्टेट, लिड बँक, आणि सहकार विभागासमोर निवेदनाची प्रत लावण्यात आली.
 
स्थानिक आझाद मैदानातून १० जुलै रोजी दुपारी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. सर्वप्रथम जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी धडक देवून ढोल वाजविले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत कर्ज उचल केलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांच्या मर्यादेत कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज थेट देण्याचे जाहीर केले होते. हे दोन्ही निर्णय होऊन १५ दिवसांवर कालावधी लोटला. तरीसुद्धा या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणीस अद्यापही सुरूवात झालेली नाही.

मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील लाख ४२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांची यादी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांकडे मागितली. दरम्यान, अध्यक्षांनी यादी बनविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षांना मागण्यांचे निवेदन देऊन १० हजार रूपयांचे कर्ज शेतकऱ्यांना तात्काळ देण्याची मागणी केली. या निधीसाठी राज्य बँकेकडे १३५ कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, तो मंजूर झाल्यास एक लाख ३५ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी सांगितले. त्यानंतर स्टेट बँक मुख्य शाखेत धडक देऊन आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थापकांना मागण्यांचे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ कर्जाची रक्कम जमा करण्याची मागणी केली. माहिती संकलित करणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शासनाकडून कर्जमाफीसाठी निधीही मिळाला नाही, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची लिडबँक असलेल्या दत्त चौकातील सेंट्रल बँकेत पोहचून आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थापकांना बँकेच्या खाली बोलावून रस्त्यावर निवेदन दिले. कर्जमाफीसह सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे, यासाठी लिड बँकेने पाठपुरावा करण्याची मागणी केली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सहाय्यक जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

या मागण्यांवर शासनाकडून तात्काळ अंमलबजावणी झाल्यास लवकरच यापेक्षा तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी दिली. आजच्या आंदोलनात नगरसेवक तथा उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे गटनेते उपजिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा संघटक मंदा गाडेकर, हरिहर लिंगनवार, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, दारव्हाचे नगराध्यक्ष बबनराव इरवे, रामराव पाटील नरवाडे, चितांगराव कदम, डॉ. विश्वनाथ विणकरे, व्यापारी आघाडी प्रमुख प्रवीण निमोदिया, संजय रंगे, किशोर इंगळे, गजानन डोमाळे, मनोज सिंगी, जिल्हा परिषद सदस्य निखीत जैत, राजकुमार वानखडे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी शिवसैनिकसहभागी झाले होते.
 
सत्ताधारीसेना रस्त्यावर, विरोधकांचे मौन : भाजप आणि शिवसेनेसह इतर घटक पक्षाने मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. अशा परिस्थितीत विरोधी बाकावरील काँग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्ष आंदोलन करून रस्त्यावर उतरतील अशी शक्यता आहे. मात्र, असे होता सत्तेतील शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
दहा हजारांचे कर्ज तातडीने द्यावे
अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेली पहिली पेरणी उलटण्याच्या मार्गावर आहे. सध्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या संकटात शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे आणि राज्य शासनाने जाहीर केलेली १० हजार रूपयांचे कर्ज तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, कर्जमाफीचे दीड लाख रूपये शेतकऱ्यांच्या कर्जात जमा करून त्यांचे कर्जमाफ करावे आणि कर्जमाफीच्या निकषात बदल करून दि. ३० जून २०१७ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करावा, आदी मागण्या अभिनव आंदोलनातून करण्यात आल्या.
 
सचिवांचा संप, याद्या बनवण्यास विलंब
दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या अद्यापही तयार झालेल्या नाहीत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सध्या सहकारी सोसायटीच्या सचिवांचा संप सुरू आहे. परिणामी, याद्या बनविण्यास विलंब होणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कर्जमाफी कधी मिळेल, हे अधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले नाही.
 
बातम्या आणखी आहेत...