आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व वैमनस्यातून टपरी चालकाचा निर्घृण खून, चार संशयित ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाभूळगाव येथील खून प्रकरणी घटनास्थळाची पाहणी करताना एसपी अखिलेशकुमार सिंह, एसडीपीओ पीयूष जगताप कर्मचारी. - Divya Marathi
बाभूळगाव येथील खून प्रकरणी घटनास्थळाची पाहणी करताना एसपी अखिलेशकुमार सिंह, एसडीपीओ पीयूष जगताप कर्मचारी.
बाभुळगाव - पूर्ववैमनस्यातून एका टपरी चालक युवकाचा लोखंडी रॉड आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सकाळी वाजताच्या सुमारास येथील यवतमाळ धामणगाव मार्गावरील बसस्थानक चौक परिसरातील मटन मार्केट जवळ घडली.
गणेश दौलत मेश्राम वय २४, रा. कोपरा पुनर्वसन असे मृतकाचे नाव आहे. शाहरूख बाबाखाँ पठाण, सलीम उर्फ गोलू गफ्फारखाँ पठाण, लियाकतखाँ पठाण, शे. जमीर उर्फ जम्म्या, सर्व रा. नेहरूनगर बाभुळगाव अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

गणेश मेश्राम हा येथील बसस्थानक चौकात पान टपरी चालवत होता. त्याच्या टपरीच्या बाजूलाच संशयित मारेकरी सलीम उर्फ गोलू हा अंडा राईसची गाडी लावायचा. त्यांच्यात एप्रिल महिन्यात म्हणजेच आठ महिन्यांपूर्वी जागेच्या कारणातून वाद झाला होता. त्यावेळी प्रकरण पोलिस ठाण्यात जाऊन दोन्ही गटांतील सदस्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही हा वाद थांबला नाही. आठ महिन्यांपासून हा वाद धुमसतच होता.
दरम्यान, आज सकाळी संशयितांनी गणेशला मटन मार्केट परिसरात गाठून त्याच्यावर लोखंडी रॉड आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवला. त्यामध्ये गणेश गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गणेशचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच मारेकरी घटना स्थळावरून दुचाकीने पसार झाले.

घटनेची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली. पाठोपाठ बाभुळगाव पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यवतमाळचे उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी गणेशचे वडील दौलत मेश्राम यांनी बाभुळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयित सलीमसह चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. एसपींचीघटनास्थळी भेट : खूनझाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसडीपीओंच्या पथकातील जमादार अजय डोळे, संजय कांबळे, बबलू चव्हाण, प्रमोद मडावी, कुणाल पांडे आदींनी शीघ्र गतीने तपासचक्रे फिरवत लियाखतखाँ पठाण, शाहरूख बाबाखाँ पठाण या दोघांना देवगाव येथील एका शेतातून, सलीम उर्फ गोलू गफ्फारखाँ पठाण याला देवगाव येथीलच एका ढाब्याच्या मागील शेतातून, तर शेख जमीरला यवतमाळकडे पसार होत असताना अटक केली.

संशयिताच्या आईचा आर्त टाहो
पोलिसांनीगणेशच्या खुनात अटक केलेल्या चौघांपैकी एका संशयिताच्या आईने पोलिस ठाणे गाठले. तसेच मातृप्रेमाचा कळवळा दाखवत माझा मुलगा तसा नाहीच, त्याला नाहक पोलिस घटनेत गोवत असल्याचे तिने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. पोलिसांनी चौकशी अंती तुझा मुलगा दोषी नसेल, तर त्याला सोडून देऊ असे सांगितल्यावरही ती काही एक ऐकायला तयार नव्हती. मुलाला सोडत नाही तोपर्यंत ठाण्यातच ठाण मांडून राहण्याची भूमिका तिने घेतली. एवढेच नव्हे तर मुलासह आपल्यालाही कोठडीत डांबण्याची विनंती तिने पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.
बातम्या आणखी आहेत...