आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालिकेशी चाळे करणाऱ्या ५० वर्षीय दुकानदारास चोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दुकानात येणाऱ्या एका १२ वर्षीय बालिकेसोबत ५० वर्षीय दुकानदार नेहमीच चाळे करत असल्याची तक्रार युवा स्वाभिमानकडे आली होती. दरम्यान, या दुकानदाराचा एक प्रताप परिसरातील एका व्यक्तीने मोबाइलमध्ये कैद केला होता. मंगळवारी (दि. १४) दुपारीसुद्धा त्या दुकानदाराने नेहमीप्रमाणे एका १२ वर्षीय बालिकेसोबत असभ्य वर्तन केले. हा प्रकार पुढे येताच परिसरातील महिला युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी या दुकानदाराला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहन पांडुरंग गाडगे (५०, रा. किरणनगर) असे त्या प्रतापी दुकानदाराचे नाव आहे.

मोहन गाडगे याचे चैतन्य कॉलनीमध्ये साई कलेक्शन नावाचे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास एक १२ वर्षीय बालिका दुकानात आली. या वेळी परिसरात शांतता होती तसेच रस्ताही निर्मनुष्य होता. याच संधीचा फायदा घेऊन या दुकानदाराने असभ्य वर्तन केले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानदाराला चांगलाच चोप दिला. दरम्यान, या प्रतापी दुकानदाराने यापूर्वी परिसरातील काही बालिंकासोबत अशाप्रकारे वर्तन केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच या दुकानदाराच्या प्रतापांसदर्भात एक निनावी तक्रार युवा स्वाभिमानकडे १० मार्च रोजी आली होती. त्यानुसार युवा स्वाभिमानने परिसरातील काही युवकांच्या मदतीने या दुकानदाराची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी एक बालिका गाडगेच्या दुकानात गेली असता त्याने युवतीसोबत असभ्य वर्तन केले होते. विशेष म्हणजे हे परिसरातील एका व्यक्तीने केलेले 'ऑपरेशन' होते. कारण त्या बालिकेसोबत दुकानदाराने जो काही असभ्य प्रकार केला तो मोबाइलमध्ये पूर्णपणे चित्रीत करण्यात आला आहे. हा जवळपास ११ मिनिटांचा 'व्हिडिओ' त्याने मोबाइलमध्ये कैद केला आहे. मंगळवारी दुपारी पुन्हा हा प्रकार पुढे आल्यानंतर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी चैतन्य कॉलनीमध्ये जाऊन त्या दुकानदाराला चोप दिला.

या वेळी युवा स्वाभिमानचे विनोद गुहे, नितीन बोरकर, सुमती ढोके, वंदना जामनीकर, अनुप अग्रवाल, अभिजित देशमुख, अनिल शेळके, संजय हिंगासपुरे, नीलेश मेश्राम, चंदू जवरे, राजेश सोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते जमले होते. दरम्यान, ही माहिती पोलिसांना मिळाली. त्या वेळी एसीपी रियोजोद्दीन देशमुख फ्रेजरपुरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून गाडगेची सुटका करून ताब्यात घेतले पोलिस ठाण्यात आणले.
त्यानंतर बालिकेच्या आईने या दुकानदाराविरुद्ध तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तक्रारीवरून फ्रेजरपुरा पेालिसांनी या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या घटनेमुळे दुकानदाराची विकृत मानसिकता शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

तक्रारीनंतर गुन्हा दाखल करणार
चैतन्य कॉलनीमध्ये एका दुकानदाराने बालिकेसोबत असभ्य वर्तन केल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रियाजोद्दीन देशमुख, एसीपी,फ्रेजरपुरा.

निनावी तक्रारीची घेतली दखल
चैतन्य कॉलनी परिसरातील एक दुकानदार बालिकांसोबत चाळे करत असल्याची एक निनावी तक्रार आमच्याकडे १० मार्चला आली होती. त्यानुसार आम्ही व्यूहरचना आखून परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली तसेच मंगळवारी पुन्हा त्याने एका बालिकेसोबत असभ्य वर्तन केले म्हणून त्याला आमच्या पद्धतीने समज देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. विनोद गुहे, युवास्वाभिमान.
बातम्या आणखी आहेत...