नागपूर - स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची घोषणा करणारे विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी शनिवारी विदर्भाच्या लढ्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यांच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव विदर्भ राज्य आघाडी असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून हा पक्ष राजकारणात उतरणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
विदर्भ राज्य आघाडीच्या विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅड. अणे यांनी ही माहिती दिली. विदर्भ राज्य आघाडीच्या रूपाने नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताना अॅड. अणे यांनी विदर्भाच्या मुद्द्याला बगल देणारे काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राजकीय पक्ष
आपले पहिल्या क्रमांकाचे शत्रू असल्याचे सांगत त्यांच्यासाठी आपले दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाला अणेंचा पाठिंबा
मराठा समाजाच्या मोर्चांनी राजकीय पक्षांना धडकी भरवली असताना अणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा जाहीर केला. अणे म्हणाले की, मराठा समाजावर अन्याय होत आहे. मोर्चांच्या माध्यमातून या समाजातील उद्विग्न भावना स्पष्ट होत आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल हवा
अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांशी सहमती दर्शविताना अणे म्हणाले की, गैरवापर होत असला तरी या कायद्याची नितांत गरज आहे. कायद्यात काही बदल करता येतील. मात्र, कायदा आवश्यकच असल्याचे त्यांनी सांगितले.