आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12% तपासात 1500 कोटी शिष्यवृत्ती घोटाळा उघड, एसआयटीच्‍या वर्षभराच्‍या तपासाचे फलित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - केंद्र सरकारच्या आर्थिक सहकार्याने राज्यात राबवल्या जाणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या एसआयटीला आतापर्यंत केवळ १२ टक्के संस्थांच्या तपासणीतून १ हजार ४१५ कोटींच्या रकमेचा घोटाळा शोधण्यात यश आले असून हे केवळ हिमनगाचे टोक असल्याची वस्तुस्थिती पुढे येत आहे.
 
या घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. व्यंकटेशम नागपूरचे पोलिस आयुक्तदेखील आहेत. या पथकाला तपासासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली असून ती मुदत उद्या मंगळवारी संपत आहे.

या घोटाळ्याचा आवाका लक्षात घेता पथकाने मुदतवाढीची विनंती राज्य सरकारला केली आहे. यासंदर्भात माहिती देताना एसआयटीचे प्रमुख डॉ. व्यंकटेशम यांनी सांगितले की, वर्षभरात एसआयटीने केलेल्या तपासात सुमारे १ हजार ४१५ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल २३ हजार ७५२ शिक्षण संस्थांपैकी केवळ २ हजार ८०२ संस्थांचीच (११.८ टक्के) तपासणी आतापर्यंत शक्य झाली असल्याने हा आकडा बराच मोठा असण्याची शक्यता आहे. 

अशी आहे योजना
दहावीनंतर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना हवे ते व्यवसायिक आणि अव्यवसायिक शिक्षण सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क वाटप योजना आहे. दरवर्षी शिक्षण शुल्कासाठी शेकडो कोटींचा निधी राज्याला मिळतो.
 
मात्र, या योजनेत २०१० ते २०१५ दरम्यान गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत मोठा घोटाळा झाल्याचे दोन वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. २०१० मध्ये गोंदिया जिल्ह्याचे कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे यांनी या गैरप्रकारांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात गरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संस्थाचालक परस्पर हडप करीत असल्याचा अहवालच त्यांनी पाठवला होता. हे चित्र संपूर्ण राज्यात असण्याची शक्यता लक्षात घेऊनच राज्य सरकारने चौकशीसाठी एसआयटी नेमली होती. 

असा केला घोटाळा
शिक्षणसंस्थांनी शिष्यवृत्तीच्या रकमेचा मलिदा खाताना अवलंबलेली पद्धत मोठीच मजेदार आहे. काही संस्थांनी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी दिलेले विद्यार्थ्यांचे बँक खातेच बनावट असल्याचे समोर आले. तर काही ठिकाणी जादाची शिष्यवृत्ती लाटण्यासाठी विद्यार्थ्यांची जातीची वर्गवारी परस्पर बदलत ती अनुसूचित जाती दाखवून जादा शिष्यवृत्ती रक्कम मिळवण्यात आली. काही प्रकरणांमध्ये दोन अर्जावर एकाच विद्यार्थ्यांचे फोटो लावून शिष्यवृत्ती लाटली गेल्याचे एसआयटीला आढळून आले. तर काही संस्थांनी तर त्याहीपुढे बनावट विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखवून त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती लाटली.
 
आतापर्यंत १४ गुन्हे 
एसआयटीने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात १०, नागपूर-२, नंदुरबार, सोलापूर प्रत्येकी १ असे एकूण १४ गुन्हे दाखल झाले आहेत.
 
पाच हजार कोटींवर..
आतापर्यंत केवळ १२ टक्के संस्थांच्या कारभाराची तपासणी केल्यानंतर दीड हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. संपूर्ण चौकशीअंती तो किमान ५ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...