आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा प्रकरणातील आरोपी अटकेत, श्रीकृष्ण नगरातील दरोडाप्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- येथील दारव्हा मार्गावर असलेल्या पाठक यांच्या घरात चाकूच्या धाकावर दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणात तब्बल सहा महिन्यानंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री केलेल्या या कारवाईत दरोड्यात सहभागी असलेल्या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पिस्तुलांसह घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

शहरातील श्रीकृष्ण नगर परिसरात आर्किटेक्ट असलेल्या पाठक यांचे घर आहे. २३ जानेवारी रोजी दुपारी सौ. शर्मिली पाठक या घरात एकट्या असताना अनोळखी दोन व्यक्ती अचानक त्यांच्या घरात शिरले. त्यांनी चाकुचा धाक दाखवून पाठक यांना खुर्चीला बांधून ठेऊन मंगळसूत्र आणि मोबाइल हिसकावून नेला होता. तेव्हापासून पोलिस या आरोपींच्या शोधात होते. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय रामचरण ठाकूर रा. पारस, जिल्हा अकोला आणि सुरज रामलाल येरवडा रा. कानह या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. कबुली मिळताच गुन्ह्याच्या वेळी घरावर पाळत ठेवणारा रमेश रंगराव कदम, रा. नवीन पुसद, पाठक यांच्या घराची माहिती पुरवणारा आकाश जगदीश शर्मा, रा. समर्थवाडी, यवतमाळ यांच्यासोबत गुन्हा करण्यासाठी सहकार्य करणारे विजय कुमार मिश्रा, रा. पारस जिल्हा अकोला सुशील दिगांबर सरगर रा. कान्हा यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या नेतृत्त्वातील पोलिस पथकाने पार पाडली आहे.

आरोपीकडे देशी कट्टाही
आरोपींकडूनदोन पिस्टल, एक देशी कट्टा, फायटर चाकू, दोन मोठे चॉपर एक इंडिका कार क्रमांक एम. एच. २९ २३६९ ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांच्याकडून आणखी अनेक गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...