आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट शहरांच्या नियोजनात ‘नीरी’च्या योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - स्मार्ट शहरांच्या नियोजनात पर्यावरणाची गुणवत्ता, घनकचरा आणि पूर व्यवस्थापन, हरित इमारती, अपारंपरिक ऊर्जेचा वापर यासह अनेक मुद्द्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन आणि योजना तयार करून देण्याची जबाबदारी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (नीरी) सोपवण्यात आली आहे.
नीरीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. एम. सुरेशकुमार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना यासंबंधीची माहिती दिली. देशातील स्मार्ट शहरांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून आता प्रत्यक्ष नियोजनाला सुरुवात होणार आहे. स्मार्ट शहरांमध्ये पर्यावरणाच्या गुणवत्तेला प्राधान्य असणार आहे. त्यासाठी शहरांना भेडसावणाऱ्या घनकचऱ्याच्या समस्येचे निदान, पूर व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर, हरित इमारतींची संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी या सर्व क्षेत्रांत तज्ज्ञ मानले जाणारे वैज्ञानिक नीरीकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे स्मार्ट शहरांना यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाची तसेच योजना तयार करून देण्याची जबाबदारी नीरीकडे सोपवण्यात आल्याची माहिती डॉ. सुरेशकुमार यांनी दिली. त्यासाठी लागणारा व्याप लक्षात घेता नीरीमध्येच सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अर्बन मॅनेजमेंट (सीसम) या नव्या केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. नीरीच्या मार्गदर्शनाखालीच हे केंद्र कार्यरत होणार असून नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार हे या केंद्राचे मार्गदर्शक असतील. नीरीच्या विविध क्षेत्रांतील डिव्हिजन्स या केंद्रामध्ये सहभागी होऊन आपापल्या क्षेत्रातील मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सुरेशकुमार म्हणाले की, सध्या नागपूर आणि गुवाहाटी या दोन शहरांनी नीरीकडे विविध विषयांच्या मार्गदर्शनाची मागणी केली आहे. येत्या काळात आणखी काही शहरांकडून प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या शहरांमधील महानगरपालिकांशी समन्वय साधून स्मार्ट शहरांच्या योजना अमलात आणायच्या आहेत. त्यासाठी प्रत्येक शहराच्या स्तरावर नेटवर्क उभारले जाणार असून त्यात त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असेल. यासाठी लागणारे तज्ज्ञांचे मनुष्यबळ लक्षात घेऊन केंद्र तरुण व होतकरू वैज्ञानिकांनाही या योजनेत सहभागी करून घेणार आहे.

पर्यावरणानुकूल स्मार्ट शहरांची उभारणी
स्मार्ट शहरांसाठी विविध क्षेत्रांत जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर सुचवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न राहणार आहेत. तत्पूर्वी विकास योजनांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घ्यावा लागणार असून भविष्यातील स्मार्ट शहरे पर्यावरणानुकूल कशी होतील, या दिशेने उपाय सुचवले जाणार आहेत, अशी माहिती नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...