आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: स्मार्टकार्ड शिधापत्रिकेचा पहिला मान लक्ष्मींना!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य वितरणाकरिता लाभार्थी परिवारांची संगणकीय नोंदणी करून स्मार्टकार्ड शिधापत्रिका वितरणास मेळघाटातून सुरुवात करण्यात अाली. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून विकसित करण्यात येत असून याच गावातील लक्ष्मी चिमोटे (कार्ड क्रमांक ५६७९३) ही महिला स्मार्टकार्ड शिधापत्रिका मिळविणारी मानकरी ठरली अाहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते लक्ष्मी चिमोटेसह २० महिलांना गुरुवारी स्मार्टकार्ड शिधापत्रिका वितरण करण्यात अाले.
स्वस्त धान्य दुकानातून होणाऱ्या अन्नधान्य वितरणातील भ्रष्टाचार थांंबविण्याकरिता राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांना स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. यातून अन्नधान्य वितरण करताना लाभार्थींचे बायोमेट्रिक प्रणालीवर बोटांचे ठसे घेऊनच रेशन दुकानातून अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांच्या परिवारातील सदस्यांच्या नावांच्या संगणकीकृत नोंदी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील हरिसाल हे गाव डिजिटल करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. याअंतर्गत हरिसाल गावातील २८० परिवारांना सर्वप्रथम स्मार्टकार्ड शिधापत्रिका देण्यास सुरुवात झाली आहे, असे अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले.

हरिसाल गावात डिजिटल प्रक्रियेला वेग
हरिसाल हे गाव डिजिटल करण्याची प्रक्रिया गतिमान हाेत आहे. या कामी राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या आठ नामांकित संस्था मेळघाटात ेवा देणार आहेत. जिल्हाधिकारी गित्ते यांनी सांगितले की, ‘या कामी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ग्रासरूट, दयालबाग, एचपी कंपनी, मुंबई येथील जे. जे. रुग्णालय, एल. व्ही. प्रसाद आय केअर आणि मुस्कान फाउंडेशन यांच्यासह काही आणखी संस्थांचा सहभाग असेल. अमेरिकन कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’च्या सहकार्याने हरिसाल गाव डिजिटल करण्यात येत आहे. अाठ महिन्यांपूर्वी सरकारने डिजिटल व्हिलेजसाठी या गावाची निवड केली हाेती.
कुटुंबातील दोन सदस्यांचे बायोमेट्रिक
हरिसाल गावात २८० कुटुंबे असून प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्यांचे बायोमेट्रिक करण्यात येईल. डिजिटल हरिसाल या उपक्रमाअंतर्गत लक्ष्मी चिमोटे, भागीरथी तांडिलकर, दुर्गा सुळस्कर, प्यारी उईके, सीताबाई चव्हाण, संतोषी धुर्वे, कमला उईके, यशोदा बेढेकर, सुमन चंदेल, मुन्नी बेठेकर, ज्याेती कासदेकर यांच्यासह २० जणांना गुरुवारी प्रातिनिधिक स्वरूपात स्मार्टकार्डचे वितरण करण्यात आले. या वेळी बायोमेट्रिक पद्धतीने संगणकावर नोंदी घेऊन स्मार्टकार्ड वापरण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...