नागपूर - ‘इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ मॅनेजमेंट’ नागपूरच्या (अायअायएम) रविवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बहिष्कार घातल्याच्या पार्श्वभूमीवर आयआयएम अहमदाबादचे संचालक आशिष नंदा यांनी गडकरी यांना पत्र पाठवून चुकीची कबुली देत माफी मागितली.
देशातील व्यवस्थापनशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था नागपुरात आणण्याचे श्रेय गडकरी यांना आहे. मात्र, या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यातच गडकरी यांना डावलल्याचा गंभीर प्रकार संस्थेकडून घडला. सध्या आयआयएम अहमदाबाद ही संस्थाच नागपुरातील संस्थेचा कारभार पाहत आहे. या सोहळ्याचे रीतसर निमंत्रण गडकरी यांना देण्यात आले नाही. सुरुवातीच्या पत्रिकेत त्यांचे नावही नव्हते. मात्र, त्यानंतर नाव समाविष्ट करून पत्रिका चक्क मेलवर पाठवण्यात अाली. पत्रिकेतही गडकरी यांचे नाव संस्थेच्या संचालकांच्याही खाली बारीक अक्षरात छापण्यात अाले हाेते. त्यामुळे नाराज झालेल्या गडकरी यांनी कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नंदा यांनी गडकरी यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली. ‘विदेशात दौ-यावर असल्याने आपल्याला आढावा घेता आला नाही. अामची मोठी चूक झाली. लवकरच गडकरी यांना व्यक्तीश: भेटणार अाहाेत,’ असे नंदा यांनी दिलगिरीच्या पत्रात नमूद केले.