आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉर्नचे ध्वनिप्रदूषण अारोग्यासाठी घातक, ‘नीरी’चा निष्कर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शहरांमध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ध्वनिप्रदूषणाची कमाल मर्यादा केव्हाच ओलांडली अाहे. त्यातच वाहनांच्या हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणात अतिरिक्त २ ते ५ डेसिबलची भर पडत आहे. वाहनांच्या तुलनेत हॉर्नमुळे होणारे ध्वनिप्रदूषण जास्त घातक ठरत असून देशभरात त्यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्याची गरज असल्याची शिफारस नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी)केली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकांच्या तुलनेत अनेक शहरांमध्ये वाहतुकीच्या गोंगाटाचे प्रमाण कितीतरी जास्त आहे. मंडळाने निश्तिच केलेल्या मानकांनुसार, दिवसा निवासी क्षेत्रांसाठी ५५ डेसिबल, बाजारपेठांच्या क्षेत्रांसाठी ६५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रांसाठी ७५ डेसिबल तर सायलेन्स झोनमध्ये ५० डेसिबलची ध्वनिमर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव, वाहनांची वाढती संख्या तसेच अनावश्यक हॉर्न वाजवण्याचे कमालीचे प्रमाण यापायी शहरांमध्ये या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत, असे मत नीरीच्या अभ्यासात मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सूचनेवरून नीरीने नागपूरसह दिल्ली, आग्रा या शहरांमध्ये ध्वनिप्रदूषणाचा अभ्यास केला आहे. नीरीच्या क्लीनर टेक्नॉलॉजी आणि मॉडेलिंग डिव्हिजनचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. रितेश विजय यांच्या नेतृत्वातील चमूने दिवसा व रात्रीच्या वेळी केलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या अभ्यासातील निष्कर्ष चिंताजनक ठरले आहेत. याशिवाय आर्थिक राजधानी मुंबईतही एका संस्थेकडून त्याचा अभ्यास पूर्वी करण्यात आला होता.

महानगर तसेच मोठ्या आणि मध्यम आकाराच्या शहरांमध्ये ध्वनिप्रदूषणाचा हा ट्रेंड लक्षात येत असल्याचे डॉ. रितेश विजय यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. ध्वनिप्रदूषणातील ५० टक्क्यांच्या वर वाटा रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचा आहे. मात्र, हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणात अतिरिक्त ३ ते ५ डेसिबलने वाढ होत आहे. वाहनांच्या हॉर्नमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचे आकडे कमी वाटत असले तरी त्याचे परिणाम कितीतरी घातक ठरत आहेत, याकडे डॉ. रितेश विजय यांनी लक्ष वेधले. उपराजधानी नागपुरातच दिवसा निवासी भागातील ध्वनिप्रदूषणाची मर्यादा (५५ डेसिबल) केव्हाच ओलांडली गेली असून सर्वाधिक वर्दळीच्या तासांमध्ये ध्वनिप्रदूषण ७३ ते ७८ डेसिबलपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे. बाजारपेठांमध्ये (मर्यादा ६५ डेसिबल) ते ७६ डेसिबलपर्यंत आल्याचे दिसून आले. देशाची दिल्लीत ते ८० डेसिबलपर्यंत गेल्याचे आढळून आल्याचे डॉ. रितेश विजय यांनी सांगितले. वाहने आणि हॉर्नमुळे कमालीचे वाढणारे ध्वनी प्रदूषण आज देशातील सर्वच शहरांपुढील मोठी समस्या झालेली आहे.

बहिरेपणाला निमंत्रण
सतत ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आजारांसह निद्रानाश, रक्तदाब, हृदयविकार अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे निष्कर्ष आहेत. नागपुरातील ईएनटी तज्ज्ञ डॉ. संजय उगेमुगे यांच्या मते बहिरेपणाच्या समस्येला वाढते ध्वनिप्रदूषण हे महत्त्वाचे कारण आहे. पाश्चात्त्य देशांत आढळून येणारी वाहतुकीची जाणीव आपल्याकडे अजिबातच नाही. त्यातल्या त्यात हॉर्न वाजवण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यावर कुठेतरी नियंत्रण आवश्यक असल्याचे डॉ. उगेमुगे म्हणाले.

हॉर्नवर प्रतिबंध
वाहतुकीच्या कोंडीचे नियोजन, खासगी वाहनांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासह हॉर्न वाजवण्यावर कठोर मर्यादा आणण्याची गरज असल्याची शिफारस अभ्यासात करण्यात आली आहे. शहरांमधील काही परिसरांमध्ये हॉर्न वाजवण्यावर प्रतिबंध घालण्याची गरज असून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाने वायूसह ध्वनिप्रदूषणही काही प्रमाणात कमी करता येते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...