अमरावती - सतत दोन वर्षांपासून सोयाबीनच्या पिकावर अवतरणाऱ्या किडींमुळे उत्पादनात झालेल्या घटीमुळे या वर्षी जिल्ह्यातील शेतकरी उडिदाच्या पिकाकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे उडिदाच्या सरासरी क्षेत्रापैकी जिल्ह्यात १११ टक्के उडिदाची पेरणी झाली असून, सोयाबीनला उडिदाचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडल्याचे दिसून येत आहे.
मागील वीस-पंचवीस वर्षांत कमी खर्चाचे पीक म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनकडे वळला. देशी वाण लुप्त झाल्यानंतर बीटी कपाशीचा वाढता खर्च त्या तुलनेने मिळणारे कवडीमोल भाव यावर पर्याय म्हणून सर्वसाधारण शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाची निवड केली. परंतु, मागील दोन वर्षांपासून ऐन फुलोऱ्यावर पावलाची उघडीप विविध रोगांना सोयाबीन बळी पडत असल्यामुळे सोयाबीनच्या पिकाने शेतकऱ्यांना जबर तडाखा दिला. दोन वर्षांपूर्वीपर्यंत सरासरी सात ते आठ क्विंटल उत्पादन होणारे सोयाबीन एकरी एक ते दोन पिकांवर आल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. त्यातच मागील दोन वर्षांत उडिदाचे उत्पादन कमी झाल्यामुळे सरासरी भाव दहा हजार रुपयांवर गेले होते. त्यामुळे या वर्षी बहुतांश सर्वसाधारण शेतकऱ्यांनी सोयाबीनला दगाबाज पीक ठरवून या वर्षी उडिदाची निवड केली आहे. सोबतच तुरीच्या पिकाला मिळालेले समाधानकारक भावामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी तुरीची आतंरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. बड्या सधन शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा कायम ठेवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत असून, या वर्षी उडीद, तुरीच्या पेऱ्यात वाढ होणार असल्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे जिल्ह्यात उडिदाचे नियोजित क्षेत्र सरासरी ५६६४ हेक्टर असताना वास्तवात ६२९० हेक्टरवर उडिदाची पेरणी झाली आहे. आंतरपीक म्हणून तुरीच्या पेऱ्यातही मोठी वाढ अपेक्षित असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पीकबदलाचे वारे : सोयाबीनचेपीक दगाबाज ठरल्याने सध्या जिल्ह्यात पर्यायी किंवा नाईलाज म्हणून या वर्षी उडिदाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत दिसून येत आहे. पेरणीचा संपूर्ण अहवाल तयार झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार अाहे.
कडधान्यांचे क्षेत्र वाढणार
^या वर्षीही मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे अन् मध्यंतरी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने पेरण्या लांबल्या आहेत. मागील पाच,सहा दिवसांपासून पावसाचा जोर वाढला तरी ३१ जुलैपर्यंत पेरणी करता येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कौल पाहता या वर्षी कडधान्यांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. दत्तात्रयमुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.
तालुकानिहाय पेरणी
तालुकाटक्केवारी
धारणी ३०.९
चिखलदरा २६.३
अमरावती ५.६१
भातकुली ३.५५
नांदगाव खं. २३.३९
चांदूर रेल्वे ३३.७
तिवसा ४५.१
मोर्शी २३
वरूड ३१.८
दर्यापूर ३१.८८
अंजनगाव ५७.३३
अचलपूर ३३.४
चांदूर बाजार ३५.२
धामणगाव रेल्वे ५९.२
पीकनिहाय पेरणीचे क्षेत्र
नावसरासरी क्षेत्र (हे.) पेरणी क्षेत्र टक्केवारी
तूर १,१४,१९५ ४५,०७० ३९.४६
सोयाबीन ३,२३,३०० ९०,०४६ २७.८५
कपाशी १,९३,२६१ ८०,१८९ ४१.४९
मूग ४४,३३६ ८,१९२ १८.४७
उडीद ५६६४ ६२९० १११.४५