आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा पावसाने ‘तारले’, मात्र भावाने ‘मारले’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दोनवर्षानंतर यावर्षी पावसाचा दुष्काळ संपल्यानंतर आलेल्या मुसळधार पावसानेही सोयाबीन, उडीदासह कपाशीच्याही पिकाची धुळधाण केल्याने सलग तिसऱ्या वर्षीही खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातात समाधानकारक उत्पन्न दिसेनासे झाले आहे. परतीचा पाऊस प्रामुख्याने सोयाबीन, उडीदाच्या पिकांसाठी उपद्रवी ठरल्याने दोन्ही शेतमालाची बाजारात हमीभावापेक्षाही कमी दराने बेभाव विक्री सुरू आहे. त्यामुळे समाधानकारक उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना जेमतेमही उत्पन्न होत नसल्यामुळे दिवाळीचा उत्साहावर पाणी फिरण्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी पावसाने दुष्काळी परिस्थितीतून तारले असले तरी पावसामुळे शेतमाल ओला झाल्याने पावसानेच मारले म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.
मागील दोन वर्षे सलग पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात सरासरी एकरी एक ते तीन पोत्यांचे उत्पादन झाले होते. काही शेतकऱ्यांनी कापणी करताच सोयाबीनवरून ट्रॅक्टर फिरवला होता. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने सोयाबीनचे उत्पादनही सरासरी एकरी पाच ते आठ पोते होत आहे. परंतू परतीच्या पावसाने तुफान हजेरी लावल्याने सोयाबीनेचे पीक मातीमोल झाले आहे. जिल्ह्यात सध्या सोयाबीनची कापणी सुरू आहे. परंतू प्रचंड ओलावा असल्यामुळे सोयाबीनची साठवणूकही धोकादायक ठरल्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनला मिळेल त्या भावात बाजार दाखवत आहेत. ओलसर सोयाबीनला किमान १९०० रुपयांपासून कमाल २३०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत आहे. केंद्र शासनाने यावर्षी सोयाबीनला २७७५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषित केला आहे. परंतू प्रचंड ओलाव्यामुळे यावर्षी सोयाबीन हमीभावही गाठू शकत नसल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. सरासरी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये सोयाबीनवर खर्च करून उत्पन्नही जेमतेम होत असल्यामुळे सोयाबीनचा दमडीचाही आधार शेतकऱ्यांना होऊ शकला नाही. मागील दोन वर्षे उडीदाच्या पिकाचे दर सरासरी दहा हजार रुपयांवर स्थिर होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही शेतकरी उडीदाच्या पीकाकडे वळले होते. उडीदाचे पिकही परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडल्याने उडीदाचे दरही किमान १७०० रुपयांपर्यत घसरले आहेत. चांगल्या दर्जाच्या उडीदाला सरासरी कमाल ६९५० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहे. सोयाबीन आणि उडीदाचे उत्पादन समाधानकारक होऊनही परतीच्या पावसाने घात केल्याने शेतकऱ्यांचे खिसे फाटकेच राहिल्याचे चित्र जिल्ह्यात येत आहे.

कपाशीचीही पातेगळ, परतीच्यापावसाचा सोयाबीन, उडीद पिकांसह कपाशीच्या पिकावरही गंभीर परिणाम झाले आहेत. पावसामुळे मोठ्या प्रमाणात कपाशीची पातेगळ झाल्याने उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कपासीचेही क्षेत्र मागील दोन वर्षाच्या तुलनेत कमालीचे घटले आहे. तुरीचे पीक सध्या जोमदार दिसत असले तरी कडाक्याची थंडी अवकाळी पावसाचे संकट या पिकांवरही असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नशीबी अनिश्चितता कायम आहे.

‘जपानी’नेहीटाकली मान
अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी खरीपातील तिज्या (लाल) दुज्या (पांढरा) भुईमुगापेक्षा जपानी (दुज्या लाल) भुईमुगाला सरासरी हजार ते पंधराशे रुपयांपेक्षा बाजारात जादा दर मिळतात. दोन आठवड्यापुुर्वीही जपानी भुईमुगाचे दर सरासरी ६२०० रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. परंत आज जपानी भुईमूगासह इतर जातीच्या भुईमुगाचेही दर कमालीचे कोसळले. जपानी भुईमूगाला किमान ५००० तर कमाल ५५५०, पांढरा दुज्या किमान ४२५० तर कमाल ४५५० तिज्या भुईमुगाला किमान ३५०० तर कमाल ४८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

सोयाबीनच्यापैशात केवळ हरभऱ्याचे बियाणे
हरभऱ्याचे उत्पादन कमालीचे घसरल्याने सध्या सोयाबीनचे दर कमाल हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी हंगामात हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाणाच्या हरभऱ्याची मागणीही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सोयाबीचे एकरी सरासरी दहा ते बारा हजार रुपयांचे उत्पादन होत असल्यामुळे हरभऱ्याच्या बियाणाचेही दरी सरासरी तेवढेच असल्याने सोयाबीन विकून क्विंटलभर हरभऱ्याचे बियाणे शेतकऱ्यांना घ्यावे लागणार आहे. मागील वर्षी बहुतांश शेतकऱ्यांना हरभऱ्याचे उत्पादन झाल्याने दुष्काळी स्थितीमुळे विकण्यासाठी काहीच नसल्याने शेतकऱ्यांनी हरभरा ऐन हंगामात सरासरी चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकून टाकला होता. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना हरभरा विकत घ्यावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

दर्यापूर अमरावती आजचे बाजार भाव
दर मिळत नसतानाही विक्रीसाठी येत असलेले सोयाबीन तर बाजूच्या छायाचित्रात अमरावती बाजारात दाखल झालेला भूईमूग.

संचालक पदे भूषवण्यातच मग्न
^बाजार समित्या शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या झाल्या. परंतू शेतकऱ्यांचीच मुले संचालक असूनही लक्ष देत नाही. पदे भूषवण्यात धन्यता मानतात. -बाळकृष्ण पुंडकर, कोकर्डा

शासन देईना मदतीचा हात
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली असतानाही मायबाप सरकार मदत करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. कागदावर शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे पॅकेज दिल्याचे दिसते प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न आजही कायमच आहेत. अात्महत्या आजही सुरू आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाला विचार करण्याची गरज आहे.

कधी सुधारणार शेतकऱ्यांची स्थिती
^मालजेव्हा घरात येतो तेव्हाच बाजारात शेतमालाचे भाव पडतात खरेदीदार व्यावसायिकांच्या संगनमताने ही लुट सुरू असते. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार कशी? -विलास तराळ, शेतकरी, सामदा

बातम्या आणखी आहेत...