आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीदारांच्या दातांनी ठरते सोयाबीन भावाची प्रतवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रतवारीनुसार भाव ठरविणारी कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन होऊनही सध्या सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. खरेदीदारच दाताने सोयाबीन दाबून बेभाव खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांवर मात्र ओठ दाताखाली दाबून मुका मार सहन करण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन झाले आहे. मागील दोन वर्षे जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबीनने तेल काढल्यानंतर यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनकडून मोठ्या आशा होत्या. परंतु परतीच्या पावसाने घात केल्यामुळे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात ओलसर सोयाबीनची आवक सुरू आहे. त्यातच ओलाव्याचे कारण पुढे करून सोयाबीनची हमीभावा पेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. बाजार समित्यांमध्ये प्रतवारीची यंत्रणा नसल्यामुळे खरेदीदारच सोयाबीनची प्रतवारी दाताने सोयाबीनचा ओलावा तपासून भाव ठरवित आहेत. केंद्र शासनाने २०१६-१७ मध्ये सोयाबीनसाठी २७७५ रुपये प्रति क्विंटल दर घोषित केला आहे. परंतु प्रतवारीची सोय नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगल्या दर्जाचे सोयाबीनही सरासरी १९०० ते २६०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केले जात आहे. बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने सरासरी एकरी पाच ते दहा क्विंटल उत्पादन होऊनही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शासकीय खरेदीचा प्रस्ताव रवाना : बाजारसमित्यांमध्ये सोयाबीची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू असल्यामुळे शासकीय खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या दोन तीन दिवसांत खरेदीला सुरवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु सोयाबीनची खरेदी खुल्या लिलाव पद्धतीने होता यासाठी नाफेड एफसीआयचे खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहे. मागील वर्षी एफसीआयने खुल्या लिलाव पद्धतीने तुरीची खरेदी केली होती. त्यामुळे लिलावात स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगले दर मिळून तुरीचे चढे दर बरेच दिवस स्थिर राहिले होते. परंतु आता या दोन्ही यंत्रणाच्या खरेदी केंद्रावर खरेदीदारांची स्पर्धा नसल्यामुळे केवळ हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. त्यातच शासकीय यंत्रणाचे खरेदीचे निकष जटील असल्यामुळे सोयाबीनच्या बाबतीत हमीभावापेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता अल्प असल्याचे जिल्ह्यातील मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. उत्पादन आहे तर भाव नाही, अशी स्थिती सध्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. निसर्गाचा मारा आणि आता बाजारपेठेचा फटका बसला आहे.
मंजुरी आल्यानंतर त्वरित खरेदी सुरू
^हमीभावाने सोयाबीनखरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी आल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्य त्वरित शासकीय खरेदी सुरू करण्यात येईल.’’ अशोक देशमुख, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती.

ओलसरपणामुळे भाव मिळतोय कमी
^शेतकऱ्यांचामालओला असल्यामुळे भाव कमी मिळत आहे. चांगल्या शेतमालाला हमी भावापेक्षाही निश्चितच जास्त भाव बाजारात दिला जातो. सरकारी खरेदी नसल्यामुळे प्रतवारी ठरविणाऱ्या यंत्रणेचा उपयोग सध्या घेतल्या जात नाही.’’ बाबारावबरवट, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर.

प्रशासनाने लक्ष द्यावे
^निसर्गाच्या लहरीपणामुळे तीनचार वर्षांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु शेतमालाचे दर दर्जा खरेदीदारच ठरवत असल्यामुळे मिळेल त्या भावात विकण्याशिवाय पर्याय नाही. कोणतेही कारण पुढे करुन खरेदीदार चांगल्या मालालाही कमी भाव देतात. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.’’ उमेश कोल्हे, शेतकरी, लेहेगांव रेल्वे.
बातम्या आणखी आहेत...