आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळी (स्पायडर) जनुकातून कापूस, अंड्यांपासून सिल्क!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- घराघरात जाळे विणणारे कोळी (स्पायडर) आता बहुपयोगी ठरणार आहेत. कारण त्यांच्या जनुकाचा वापर करीत कापूस आणि कोंबडीच्या अंड्यांपासून सिल्क निर्मिती शक्य होणार आहे. सिल्क तयार करण्यासाठी संपूर्ण जगात सोनेरी जाळे विणणाऱ्या कोळ्याच्या (गोल्डन वेब स्पायडर) प्रजातीवर संशोधन सुरू आहे.

विशेषत: कोळ्याची ही प्रजाती विदर्भातील ताडोबा व मेळघाटात मोठ्या प्रमाणात आढळते. अमरावती येथे १६ नोव्हेंबरला आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय कोळी परिषदेत शास्त्रज्ञांकडून सेंट्रल इन्स्टिट्यूट फाॅर कॉटन रिसर्चसमोर (सीआयसीआर)हे संशोधन मांडले जाणार आहे.
मेळघाट व ताडोबा क्षेत्रात आढळणारा गोल्डन वेब स्पायडर लोखंडापेक्षा टणक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याच्या जनुकाचा वापर कापसामध्ये केल्यास विदर्भात मोठ्या प्रमाणात ‘सिल्क कॉटन’चे उत्पादन होऊ शकते. कापसामध्ये प्रोटीन कमी असल्याने कोळी जनुकाला अपेक्षित ऊर्जा किंवा मदत मिळू शकणार नाही. मात्र कापसापासून प्रत्यक्ष सिल्क निर्मिती शक्य नसली तरी कोळी जनुक टाकण्यात आल्यानंतर कापसाच्या धाग्याची क्षमता वाढण्याची अपेक्षा संशोधकांना आहे.

वानखेडे यांचे संशोधन : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. गणेश वानखडे सातत्याने कोळ्यांच्या (स्पायडर) विविध प्रजातींवर संशोधन करीत आहेत.

अंड्यापासून सिल्क
हैदराबाद येथील प्रयोगशाळेत कोळी जनुकाचा वापर करून अंड्यापासून सिल्क निर्मिती करण्यावर संशोधन सुरू आहे. अंड्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असल्याने त्याचा लाभ सिल्क निर्मितीकरिता होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे.

सिल्कचे महत्त्व
सिल्क ही अत्यंत महत्त्वपूर्ण नैसर्गिक देण असून त्याचा सर्वच क्षेत्रांत वापर केला जात आहे. जागतिक स्तरावर संरक्षण, बांधकाम ते दैनंदिन उपयोगात सिल्कचा वापर होत असताना भारतात मात्र हा वापर अत्यंत कमी आहे. अमेरिका व कोरिया या देशांत कृत्रिम सिल्कचा वापर विविध वस्तूंमध्ये केला जातो.

सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. वानखडे यांनी स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण करीत कोळी प्रजातीवर संशोधन सुरू ठेवले. अमेरिका व कोरियामध्ये बकरीमध्ये कोळीचे जनूक (स्पायडर जीन) टाकण्यात आला असून दुधापासून कुत्रिम सिल्क निर्मिती केली जाते. त्या सिल्कचा वापर लष्करात मोठ्या प्रमाणात केला जातो. शिवाय कोरियात बांधकाम क्षेत्रात या सिल्कचा वापर होतो. सिल्कपासून तयार करण्यात आलेले दोर (फ्लेक्झिबल सस्पेन्शन केबल) पुलासाठी वापरण्यात आले आहेत.

सिल्कचा उपयोग
> यूएस आर्मीमध्ये बुलेटप्रूफ जॅकेट : भारतात बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये ३३ स्तर असतात. या सिल्कच्या वापराने केवळ ४ स्तराचे जॅकेट निर्मिती शक्य. हे जॅकेट वजनाने हलके होईल. अमेरिकी लष्करात सध्या याचा वापर होतो.
> लढाऊ विमानामध्ये चॉफ : शत्रूने विमानातून क्षेपणास्त्र डागले तर सिल्क भुकटीचा (चॉफ) आधार घेतला जातो. सिल्कमधील पदार्थातील रेडिओ फ्रिक्वेन्सी मिसाइलचे लक्ष्य वेधतात आणि नेम चुकून विमान सुरक्षित राहू शकते.
> स्पायडर सिल्पासून गिटार या वाद्याच्या तारांची निर्मिती केली जाते.
> मणक्यातील गॅप भरून काढण्यासाठी (इंटरव्हर्टिबल डिस्क) पदार्थाची अमेरिकेत निर्मिती केली जाते.
> उड्डाणपुलात दोरी म्हणून कोरियामध्ये स्पायडर सिल्कचा वापर करण्यात आला. { घराचे बांधकाम करताना लोखंडी सळ्याऐवजी सिल्क रॉडचा वापर.
> वाहनांमधील एअरबॅग्जची निर्मिती
> अधिक उष्ण वहन क्षमता असल्याने इलेक्ट्रिक वायरमध्ये वापर (सिल्क इलेक्ट्रिक केबल)
> बायोडिग्रेडेबल बॉटलची निर्मिती
> स्पायडर वेब ग्लास : घरांच्या काचांमध्ये कोळी सिल्कचा वापर केल्यास खिडक्यांना धडकून मरणाऱ्या पक्ष्यांचे जीव वाचण्यास मदत होईल.
> रेशीम किड्यामध्ये स्पायडर जीन टाकत सिल्कची उत्पादन क्षमता वाढवण्यात येत आहे.
> विविध सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा वापर केला जात आहे.
कोळी प्रजाती
>कोळी नर हा मादीच्या १० पट लहान असतो.
>जगात ४६ हजार विविध प्रजाती
>विदर्भात १६०० विविध प्रजाती

पुढील स्लाइडवर वाचा, सीआयसीआरला मदत करणार