आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक वास्तव : मृत्यूची घंटा बांधून विद्यार्थ्यांच्या जीवनाची सुरू आहे आकडेमोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्गखोलीला गळती लागल्याने विद्यार्थ्यांचा वर्ग व्हरांड्यात. - Divya Marathi
वर्गखोलीला गळती लागल्याने विद्यार्थ्यांचा वर्ग व्हरांड्यात.
शिरजगाव कसबा - तडकलेल्या भिंती, डोक्यावरून उडालेले छप्पर, त्यावरून गेलेल्या जीवंत विजेच्या तारा अशा अवस्थेत मृत्यूची घंटा गळ्यात बांधलेल्या स्थितीत पांढरी (ता. चांदूर बाजार) येथील २७ विद्यार्थी सध्या मोफत शिक्षणाचा हक्क बजावत आहेत.
 
शाळेची इमारत पाडण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या राजकीय ‘खटल्यात’ चार वर्षांपासून धूळखात पडून असल्याने कोवळे जीव सध्या ओलसर भिंतीच्या आडोशाला बसून जीवनाची आकडेमोड शिकण्यात व्यस्त आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ घोषवाक्य असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या काळात नवीन वर्गखोल्या बांधणे सोडा. परंतु जीर्ण झालेली शाळा पाडण्याचाही कागद हलत नसल्यामुळे या शाळेचे विद्यार्थी शिक्षक सध्या जीव मुठीत घेऊन वावरत असल्याचे भीषण वास्तव आहे. 
 
चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा ग्रामपंचायती अंतर्गंत सुमारे साडे तीनशे लोकवस्ती असलेल्या पांढरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेची स्थापना जुलै १९५६ रोजी करण्यात आली. एक ते पाच वर्ग असलेल्या या शाळेत सध्या २७ विद्यार्थी शिक्षक घेत असून दोन वर्ग खोल्या आहेत. या शाळेत दोन शिक्षक असून शाळेची इमारत मागील अनेक वर्षांपासून शिकस्त झाली आहे. भिंतीला तडे गेले आहेत. दोन खोल्यांपैकी एका खोलीवरील छप्पर उडून गेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शाळा सध्या ओलसर भिंतीच्या आडोशाला व्हरांड्यात भरत आहे. गावातील शाळेतील भीषण अवस्था असली तरी बाहेरगावी मुलांना पाठविण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे “हातावर आणून पानावर खाणाऱ्या’ श्रमजीवी वर्गाची मुले या शाळेत भविष्याचे पाठ गिरवत आहेत. भिंतीला तडे गेल्यामुळे ती केव्हाही कोसळू शकते अशा अवस्थेत आली आहे. एका खोलीवरचे टिनपत्रे उडून गेली असून दुसरी खोली गळत असल्याने व्हरांड्यातच सध्या शाळा भरत आहे. त्यातच या शाळेवरून वीजेच्या तारा गेल्या आहेत. सप्टेबर २०१४ मध्ये या जीवंत तारा शाळेवर कोसळल्या होत्या. त्यामुळे ही शाळा काही दिवस बंद करण्यात आली होती. २०१३ पासून अनेक वेळा शिरजगाव कसबा येथील वीज अभियंत्यांना या तारांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असून, त्या हटविण्यात याव्या याबाबत मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीकडून वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु गतीमान शासनाच्या कार्यकाळात साधे विजेचे तारही हटू शकले नाही. मुलांच्या जीविताला धोका असल्यामुळे शाळा त्वरित पाडण्याबाबत गटशिक्षणाधिऱ्यांकडे तक्रारी केल्या. परंतु तब्बल चार वर्षांंपासून कागदी घोडेच प्रशासनाच्या दारात नाचत असल्यामुळे शाळेतील कोवळे जीव शिक्षकांच्या जीविताचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
१९०पैकी १२५ प्रस्ताव पं. स.मध्ये धुळखात : जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील १९० शाळा शिकस्त झाल्या आहेत. यापैकी केवळ ६५ शाळांचे प्रस्ताव पंचायत समितीकडून पाठविण्यात आले असून बांधकाम विभागाने शाळा पाडण्यासाठी बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. परंतु अद्यापही १२५ शाळांचे प्रस्ताव पंचायत समितीकडेच धुळखात पडले आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या जीविताबद्दल तालुका प्रशासन किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. 
 
निधीची कमतरता: निधीच्या कमतरतेमुळे शाळा पाडून नव्याने बांधणे शक्य नाही. प्रशासनाच्यावतीने शाळा पाडण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. प्राधान्यक्रमानुसार शाळा पाडून नव्याने बांधकाम करण्यात येईल,असे जि.प.चे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी सांगितले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, असा केला पाठ पुरावा...