आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडीक जमीन फार; क्रीडांगणांची मारामार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भाचे क्रीडा नंदनवन म्हणून नावलौकिक असलेल्या अमरावती जिल्ह्यात हजारो हेक्टर जमीन पडीक अतिक्रमित असताना तीन तालुक्यांमध्ये अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला जागाच मिळत नसल्याने पडीक जमीन फार, क्रीडांगणांची मात्र मारामार,असे म्हणण्याची वेळ तेथील खेळाडू क्रीडाप्रेमींवर आली आहे. परिणामी अमरावती, अंजनगाव सुर्जी आणि चिखलदरा येथील खेळाडू क्रीडा संकुलापासून अजूनही वंचित आहेत.
ज्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलाची सुविधा नाही त्या शहराजवळची पडीक अतिक्रमित जमीन त्याब्यात घेऊन तेथे संकुल उभारून क्रीडा विकास साधता येणे सहज शक्य आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्ह्यातील संबंधित विभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्याची गरज आहे. असे झाल्यास ग्रामीण भागातही चांगले खेळाडू घडतील सोबतच शासकीय महसुलातही वाढ होईल, असे मत क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात पडीक जमीन चार टक्के, अतिक्रमणाखालील क्षेत्र एक टक्के तर क्रीडांगणाखालील जमीन ही केवळ ०.०३३ टक्के कमी आहे. क्रीडांगणासाठी असलेल्या जमिनीचे क्षेत्र वाढवायचे असेल तर पडीक अतिक्रमित जमिनीचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्यायला हवा, तरच खेळाडू घडतील, समाज सुदृढ सशक्त बनेल. साेबतच उत्तम खेळाडूंमुळे जिल्ह्याचा सन्मानही वाढेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
चिखलदरा येथे सिडकोने विकास आराखडा तयार करून ज्या जागेवर क्रीडांगण उभारायचे निश्चित केले ती जागा क्रीडातज्ज्ञांच्या मते तालुका क्रीडा संकुलासाठी सयुक्तिक नाही. यासाठी योग्य जागेचा शोध सुरू आहे. त्याऐवजी जिल्ह्यात जी पडीक किंवा अतिक्रमित जमीन आहे त्यापैकी योग्य जागा शोधून तेथे क्रीडांगण उभारले जाऊ शकते,अशी माहिती डीएसओंनी दिली.

परेडग्राउंड जागा क्रीडांगणासाठी
अचलपूर येथील परेड ग्राऊंडची ३.५ हेक्टर आर जागा ही क्रीडांगणासाठी शहर विकास आराखड्यात आरक्षित असून, नगर परिषदेच्या ताब्यात आहे. नगर परिषदेने अद्याप त्या ठिकाणी क्रीडांगण विकासाचे काम केले नाही. आमदार बच्चू कडू यांनी ही जागा क्रीडांगण उभारण्यासाठी तालुका क्रीडा संकुल समितीच्या ताब्यात देण्यात यावी, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री क्रीडामंत्र्यांना भेटून तसेच पत्र देऊन पाठपुरावा केला होता. क्रीडा संकुलाचा बीओटी प्रोजेक्टही तयार करण्यात आल्याची माहिती अचलपूरचे तालुका क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिए यांनी दिली.

क्रीडांगणासाठी दुप्पट जागा देण्यास तयार
^अंजनगाव सुर्जीयेथे बसस्थानकापुढे कृषी विभागाने रोपवाटिकेसाठी सहा एकर जागा आरक्षित करून ठेवली आहे. ती जागा क्रीडांगणासाठी योग्य आहे. कृषी विभागाची ही जागा आम्हाला मिळाली तर त्याऐवजी दुप्पट जागा आम्ही कृषी विभागाला देण्यास तयार आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनीही यास संमती दिली होती. अविनाश पुंड, जिल्हाक्रीडा अधिकारी,अमरावती.

आवश्यकतेच्या वेळी अतिक्रमित जागा घेऊ
^शासनाला ज्यावेळी जागेची आवश्यकता भासेल त्या वेळी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करून अतिक्रमित जागा ताब्यात घेतली जाईल. शंकर शिरसुद्धे, उपजिल्हाधिकारी(महसूल) .