आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसचेही अाता कळणार ‘लोकेशन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : रेल्वे आणि विमान वाहतुकीच्या धर्तीवर आता राज्यातील रस्त्यांवरून धावणाऱ्या एसटी बसची क्षणोक्षणीची माहिती प्रवाशांना एका क्लिकवर उपलब्ध होईल. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तासन् तास बसथांब्यावर एसटी बसची प्रतीक्षा करावी लागणार नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम लावण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
बसेसना ट्रॅकिंग सिस्टिम लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून या जीपीएस तंत्रज्ञान प्रकल्पासाठी निविदा काढल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. बसेसच्या ‘लाइव्ह रनिंग स्टेटस’ची माहिती एका विशिष्ट अॅपद्वारे उपलब्ध होईल.
ट्रॅकिंग सिस्टिममुळे प्रवासाला निघालेली एसटी बस नेमकी कुठे आहे हे बघता येणे अगदी सोपे होणार आहे. बसेसचे लोकेशन कळणार असल्याने प्रवासाचे नियोजन करणे सोईचे होईल, असे रावते म्हणाले.
प्रवास सवलतीचे ‘स्वामित्वाधिकार’ परिवहन विभागाकडे
राज्यातील विविध योजनांद्वारे एसटी बसेसमधून प्रवास करताना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलतींचे स्वामित्वाधिकार आता परिवहन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
यामुळे विविध सवलती आणि मोफत प्रवास योजनेच्या खर्चापोटी दरवर्षी राज्य सरकारकडून १८०० ते २००० कोटी राज्य परिवहन महामंडळाला देण्यात येतात. एसटी महामंडळाचा हा पैसा वर्षानुवर्षे शासनाकडून मिळत नसल्याचाच आजवरचा अनुभव आहे.
मात्र आता या सर्व विविध सवलतींचे स्वामित्व अधिकार परिवहन विभागाकडे अाल्याने पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पापासून एसटी महामंडळाला दरवर्षी १८०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
भांडवली खर्च म्हणून महामंडळाला दरवर्षी ५०० कोटींची तरतूद करण्यात आल्याने महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे रावते यांनी सांगितले. एकूणच आता राज्य परिवहन महामंडळ हायटेक होण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...