आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसटी’ च्या परीक्षेचा पेपर नागपुरात फुटला? एका केंद्रावरील परीक्षा रद्द, पुन्हा होणार परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर  - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातर्फे रविवारी  कनिष्ठ सहायक पदांसाठी राज्यभर परीक्षा घेण्यात अाली. मात्र  नागपुरातील झुलेलाला इन्स्टिट्यूट केंद्रावर हा पेपर फुटल्याचा आरोप करीत काही उमेदवारांनी परीक्षा बंद पाडली. तर हा पेपरफुटीचा प्रकार नसून एका केंद्रावरील अव्यवस्थेतून हा प्रकार घडल्याचा दावा एसटीच्या अधिकाऱ्यांनी केला अाहे. तसेच  या केंद्रावरील परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.   
 
दरम्यान, या घटनेची चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नागपुरातील चार केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा घेण्याचे कंत्राट मुंबईच्या आरसी इन्फोटेक या कंपनीला देण्यात आले होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पेपर सुरू होणार होता. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही विद्यार्थ्यांच्या हाती हा पेपर लागला, असा काही परीक्षार्थीं उमेदवारांचा आरोप आहे. त्यामुळे सुमारे बाराशे उमेदवारांनी परीक्षेवर बहिष्कार घालून केंद्रापुढे घोषणाबाजी केली. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांशी चर्चा करून परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. लवकरच परीक्षा पुन्हा घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच उमेदवारांनी आंदोलन मागे घेतले.   
 
पेपर फुटला नाही  : पंचभाई  
 एसटीचे विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना पेपर फुटला नसल्याचा दावा केला. परीक्षा केंद्रावरील २१ कक्षांमध्ये सुमारे बाराशे विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली होती. मात्र, कुठेही रोल नंबरनुसार बसण्याची व्यवस्था नव्हती. २१ पैकी १९ कक्षांमधील परीक्षक वगळता इतर केंद्रावरील परीक्षक उशिरा केंद्रावर पोहोचले. त्यामुळे तीन कक्षांमध्ये पेपर देण्यास उशीर झाला. या घोळामुळे अनेक उमेदवार पेपर न देताच बाहेर आले व त्यांनी इतर उमेदवारांचे पेपर हिसकावून ते व्हाॅट्सअॅपवर टाकले, असा दावा पंचभाई यांनी केला. केंद्रावर अव्यवस्था होती हा आरोप पंचभाई यांनी मान्य केला, मात्र पेपर फुटल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. 
बातम्या आणखी आहेत...