आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीतील वितुष्ट कायम; मिनी महापौरपदांसाठी लढतीचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेतील मिनी महापौरपदासाठी लढत होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे. स्थायी समिती सभापतिपदावरून निर्माण झालेले आघाडीतील वितुष्ट कायम असल्याने त्याचा थेट परिणाम या निवडणुकीवर दिसून येईल. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण या निवडणुकीत चव्हाट्यावर येण्याची अधिक शक्यता आहे.
मिनी महापौरपदावरून महापालिकेत रणधुमाळी सुरू झाली असून, गुरुवार, एप्रिलला ही निवडणूक होऊ घातली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या उपस्थितीत पाच झोन सभापती अर्थात मिनी महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये पदांच्या वाटपाबाबत करार करण्यात आला होता. लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलले. राष्ट्रवादीला रामराम ठाेकत संजय खोडके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या काँग्रेसमधील प्रवेशानंतर देखील अंतर्गत राजकारण पूर्णपणे बदलले आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीत खोडके विरुद्ध शेखावत असे चित्र पाहावयास मिळाले. महापालिकेच्या तिजोरीची चावी आपल्या गटाच्या ताब्यात राहावी,यासाठी खोडके गटाने मोर्चेबांधणी करून त्यात यश मिळवले. अविनाश मार्डीकर सभापती झाले असले तरी काँग्रेस सदस्यांनी निवडणुकीत भाग घेतला नाही. शिवाय स्थायी समितीच्या बजेट बैठकीला देखील काँग्रेस सदस्य अनुपस्थित होते. त्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले असून, त्याचे थेट परिणाम मिनी महापौरपदाच्या निवडणुकीत दिसतील, यात शंका नाही. रामपुरी कॅम्प, मध्य झोन, हमालपुरा झोन, बडनेरा तसेच भाजी बाजार आदी पाच झोन सभापतिपदासाठी ही निवडणूक होत आहे. विद्यमान मिनी महापौरांचा कार्यकाळ एप्रिलला संपुष्टात येत आहे. सद्य:स्थितीत दोन काँग्रेस, दोन राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट तर एक भाजपचे मिनी महापौर आहेत.