आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Education Minister Decision For 10 Th Student At Maharahstra

दहावीच्या प्रतिष्ठेपायी नववीतच गळतीचा ‘ड्रॉप’; अडीच लाख विद्यार्थी गाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- दहावीच्या निकालात आपली पत राखण्यासाठी शिक्षणसंस्था आटोकाट प्रयत्न करतात. परिणामी मागील शैक्षणिक सत्रात सुमारे 2 लाख 57 हजार विद्यार्थी इयत्ता नववीत ड्रॉपआऊट (गळती) झाल्याचे शिक्षण विभागाच्या आढाव्यात आढळून आले आहे. ड्रॉपआऊटचे हे प्रमाण कमी करण्यासाठी शाळांशी संवादासह अनेक उपाययोजनांचे प्रस्ताव सध्या शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहेत. नववीतील विद्यार्थी गळतीचा विषय सध्या शालेय शिक्षण विभागाच्या अजेंड्यावर आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी या मुद्द्यावर अधिकारी आणि तज्ज्ञांची एक बैठक घेऊन त्यावर व्यापक विचारविनिमय केला. त्यात अनेक उपाययोजना पुढे आल्या असून त्यावर शिक्षण विभागात विचारमंथन सुरू आहे. नंदकुमार यांनी नववीतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण चिंताजनक असल्याची कबुली दिली. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे आलेल्या माहितीनुसार २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात लाख ५७ हजार विद्यार्थी नववीत गळाल्याचे आढळून आल्याचे नंदकुमार यांनी सांगितले. एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण १४.५ टक्क्यांच्या आसपास आहे. तर २०१३-१४ मध्ये हे प्रमाण १६ टक्क्यांच्या वर होते. दहावीच्या मुख्य परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६.५ लाखांच्या आसपास असते याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले, विद्यार्थी गळतीची अनेक कारणे असू शकतात. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेला चाळणीच लागत नसल्याने ते नववीत उघडे पडतात होतात. हे त्यामागील प्रमुख कारण असू शकते. यासंदर्भात सर्व दोष शाळांना देणे योग्य नाही.
यासंदर्भात शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुळकर्णी यांच्या मते नववीमध्ये विद्यार्थी गळतीचा दर आपल्याकडे खूपच जास्त आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे आठवीपर्यंत गुणवत्तेची चाळणी लागत नाही हे आहेच. शाळांचीही एक वर्षात कष्ट घेण्याची तयारी नसते. त्यामुळे शाळा दहावीच्या निकालात आपली प्रतिष्ठा जपण्यासठी सर्रास नववीत चाळणी लावतात. अनेक शाळांमध्ये दहावीच्या तुकड्या एक किंवा दोनने कमी का असतात? या प्रश्नातच विद्यार्थी गळतीचे रहस्य दडलेले आहे. दरम्यान, या समस्येवर उपाय म्हणून शिक्षण विभागात सध्या अनेक प्रस्तावांवर विचार सुरु आहे.

> दहावीचा निकाल उत्तम लागावा म्हणून अनेक संस्था नववीतच कच्च्या मुलांना जाणीवपूर्वक नापास करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा शाळा ओळखून त्यांच्या मुख्याध्यापकांशी बोलण्याच्या सूचना सर्व उपसंचालकांना दिल्या आहेत. आता पाचवीतील परीक्षेच्या निर्णयाचाही फायदा होईल.
-विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री