आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Education Minister Decision For 10 Th Student At Maharahstra

स्वयं अध्ययनानेही रोखता येईल नववीचा ड्रॉपआऊट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- दहावीच्या निकालाची प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक शाळा अभ्यासात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्यांना नववीतच गाळत असल्याचे समाेर अाले अाहे. गेल्या वर्षी सुमारे लाख ५७ हजार विद्यार्थ्यांना असे ‘ड्राॅपअाऊट’ करण्यात अाल्यावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाश टाकला हाेता. मात्र, ही गळती टाळण्यासाठी अाता शिक्षण विभाग अनेक पर्यायांवर विचार करत अाहे. त्यात इयत्ता आठवी ते दहावीचा शंभर टक्के निकाल लागणाऱ्या शाळांमधील अध्यापनाची पद्धती इतरत्र अमलात आणावी, स्वयंअध्ययनाचा पॅटर्न राबवण्याचा विचार व्हावा, नववी आणि अकरावीच्या परीक्षादेखील राज्य शिक्षण मंडळानेच घ्याव्यात, अध्यापनाचे आदर्श मॉडेल शोधून त्याचा अवलंब व्हावा यासह असंख्य सूचनांचा समावेश अाहे.

शिक्षण संचालनालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीतील ‘ड्रॉपआऊट’च्या प्रमाणावर नागपुरात नुकत्याच झालेल्या बैठकीत बराच खल झाला. त्यातून काही महत्त्वाच्या सूचना पुढे आल्या आहेत. त्या सूचनांवर सध्या शिक्षण विभागात विचार सुरू आहे. त्यापैकी काहींवर अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे इयत्ता आठवी ते दहावीचा शंभर टक्के निकाल देणाऱ्या शाळांचा शोध घेण्यात येत असून त्या शाळांची अध्यापन पद्धती जाणून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नववीमधील अप्रगत मुलांचा शोध घेऊन जलद शिक्षणातून त्यांची तयारी करून घेण्याच्या सूचना लवकरच शाळांना दिल्या जाणार आहेत.

जेवढी मुले नववीला बसतील तेवढीच दहावीलादेखील बसावीत यासाठी शाळांनी प्रयत्न करावेत, अशाही सूचना दिल्या जाणार आहेत. नववी आणि अकरावीची परीक्षादेखील शिक्षण मंडळाने घ्यावी, पहिली ते आठवीप्रमाणेच नववी ते बारावीपर्यंतची मूल्यमापनाची पद्धती एकसारखी ठेवावी, नववीतही बेसलाइन चाचणी घ्यावी, अशाही काही सूचना शिक्षण विभागाकडे आल्या आहेत.

मुलींच्या ड्राॅपअाऊटचा गांभीर्याने विचार
याबाबतशिक्षण संचालक एन. के. जरग म्हणाले, ग्रामीण भागात मुलींच्या ड्रॉपआऊट कारणांचाही विचार आवश्यक आहे. लहान वयात विवाह, घरापासून शाळेचे दूर अंतर अशी अनेक कारणे मुलींच्या ड्रॉपआऊटमागे दिसून येतात. त्यावरदेखील शिक्षण विभागाकडून गांभीर्याने विचार केला जात अाहे.

शाळांना दाेष देण्यात अर्थ नाही : शिक्षण सचिव
ड्रॉपआऊटवरशिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची मते परखड आहेत. ‘मुले पुरेशी शिकलेली नसणे हेच ड्रॉपआऊटचे खरे कारण अाहे. यात शाळांना दोष देण्यात अर्थ नाही. दोष आम्हा सर्वांचाच आहे. आठवीपर्यंत सरसकट विद्यार्थी पास हाेत गेल्याने त्यांची नेमकी पात्रता कुठेच माहिती करून घेतली जात नाही. त्यावर उपाय म्हणून आपल्याला स्वयंअध्ययनाचा पॅटर्न सोयीस्कर वाटतो. मुलांनी स्वत:हून शिकणे अपेक्षित आहे. गटपद्धतीने चर्चा करायच्या. नवीन चॅप्टर सुरू झाला की मुलांनी आपसात पाने वाटून घेऊन वाचन करायचे. त्यावर चर्चा करून एकमेकांचे शंकानिरसन करायचे. गेल्याच आठवड्यात नाशिक येथे ४० मुलांनी त्याचे प्रात्यक्षिक सादर केला,’ असे नंदकुमार म्हणाले.