आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरही निवडून आले नसते : शेषराव मोरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असते तर आजच्या निवडणुकीच्या राजकारणात तेही कधीच निवडून आले नसते. कारण धर्माच्या नावावर त्यांनी मते मागितली नसती. शिवाय त्यांचे कठोर विचारही लोकांना पटले नसते,’ असे मत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सावरकर विचारांचे अभ्यासक शेषराव मोरे यांनी साेमवारी मांडले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची उणीव आज प्रकर्षाने जाणवत नाही का, या प्रश्नावर बोलताना मोरे यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. ‘सावरकर टोकाचे बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांचा बुद्धिवाद आजच्या परिस्थितीतही तितकाच प्रखर वाटतो. पुढील ५० वर्षांतही तो लोकांच्या पचनी पडेल की नाही याची शंका वाटते. सावरकर हिंदुत्ववादी होते किंवा त्यांना हिंदुराष्ट्र निर्माण करायचे होते, असे अनेक गैरसमज त्यांच्याबद्दल पसरवण्यात आले आहेत. सावरकरांची मुस्लिमांबद्दलची मतेही चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आणली गेली. प्रत्यक्षात सावरकरांना मुस्लिमांसह सर्व धर्मीयांनी भारतात गुण्यागोविंदाने नांदणे अपेक्षित होते,' असे मोरे म्हणाले.
भारताविरुद्ध बोलणे चुकीचेच
‘जेएनयू’मध्ये अफझल गुरूच्या बाजूने सभा घेणे, भारताविरोधात नारेबाजी करणे, त्याला तेथील प्राध्यापकांचा पाठिंबा असणे, हे देशाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. देशविरोधी कारवायांसाठी कसले आले अभिव्यक्ती स्वातंत्र्य?’ असा सवाल मोरे यांनी केला.
राष्ट्रप्रेम शिकवण्याची गरज
प्रत्येकच भारतीयाच्या मनात ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’ म्हणण्याची भावना आहे. तशी पूर्वीपासून पद्धतच आहे. त्यावर कोणी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही, असे सांगतानाच राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद, राष्ट्रभूमी या संकल्पना खूप मोघम आहेत. राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रप्रेम म्हणजे काय हे शिकवण्याची आज गरज आहे. त्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज आहे, असे मोरे यांनी स्पष्ट केले. शरद पोंक्षे यांना रसिकराज साहित्य संमेलनाचे आमंत्रण असूनही ऐनवेळी त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावर शेषराव मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. पोंक्षे यांना बोलू द्यायला पाहिजे होते. नंतर त्यांचे काय चुकले यासाठी दुसरे व्याख्यान ठेवून त्यांची मते खोडता आली असती, असे मोरे म्हणाले.