नागपूर - ‘आयआयएम नागपूर ही संस्था देशातील व्यवस्थापनाचे धडे देणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नावलौकिक मिळवेल,’ असा विश्वास व्यक्त करताना ती नागपुरात सुरू झाल्याने विदर्भ आणि नागपूरकरांचे मोठे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आयआयएम नागपूर संस्थेच्या पहिल्या बॅचमध्ये देशभरातून ६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, पहिल्या सत्राची सुरुवातही रविवारपासून झाली. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई व पुण्यात शिक्षणाच्या दर्जेदार संधी उपलब्ध असल्याने तेथे औद्योगिक विकासाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला. आता नागपूर आणि विदर्भातही ती परिस्थिती येणार आहे.
गडकरींचा कार्यक्रमावर बहिष्कार ?
नागपुरात आयआयएमसारखी संस्था खेचून आणण्याचे श्रेय ज्यांना आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात असूनही कार्यक्रमापासून दूर राहिले. आयआयएम अहमदाबाद या संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पत्रिकेत गडकरी यांचे नाव या संस्थेचे संचालक आशिष नंदा यांच्या ही नावाखाली बारीक अक्षरात छापण्यात आले. प्रोटोकॉल न पाळण्यात आल्याने नाराज गडकरींनी कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले.
जागतिक दर्जाची संस्था
आयआयएम नागपूर ही व्यवस्थापनशास्त्र क्षेत्रातील जागतिक दर्जाची संस्था म्हणून नावारूपास यावी यासाठी आमचे प्रयत्न राहतील, अशी ग्वाही आयआयएम अहमदाबादचे संचालक आशिष नंदा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सध्या या संस्थेच्या अनुभवी मार्गदर्शनाखालीच आयआयएम नागपूरची वाटचाल सुरू राहणार आहे. ही आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून नंदा म्हणाले की, लवकरच या संस्थेचे संचालक मंडळ तसेच इतर नियुक्त्या होणार आहेत. आतापर्यंत देशातील सर्वच आयआयएम संस्था सुरुवातीला तात्पुरत्या जागेत सुरू होऊन नंतर त्या स्थायी संकुलात स्थानांतरित करण्यात आल्या आहेत.