आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात वादळी पावसामुळे शेतासह घरांचे मोठे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातमागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने थैमान घातले आहे. दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार तालुक्यात शेती खरडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान मोर्शी तालुक्यात दमयंती नदीच्या पुरात जिनी देवरा कुमरे, ४५, रा. चिंचोली गवळी ही महिला वाहून गेली. धारणी तालुक्यातील वीज कोसळून बारू येथील वनिता कास्देकर ही मुलगी ठार झाली.
दर्यापूर येथील चंद्रभागात नदीसह नाल्यांना शनिवारी आलेल्या पुरामुळे सुमारे सहा-सात गावांतील शेती खरडून ४०० हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले. वडाळी नाल्याच्या काठावरील घडा-सांगवा, चांदई, गौरखेडा, माटरगाव, जसापूर येथील जमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या. येथील काही शेतांमध्ये पेरणी झाली होती. लाखमोलाची माती पेरलेली खते, बियाणे वाहून गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या गावातील सुमारे ४०० हेक्टरवर शेतवरील शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. नुकसान झालेल्या शेताची उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पाहणी केली. तिकडे चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा, माधान, देऊळवाडा, काजळी, ब्रह्मणवाडा थडी, घाटलाडकी, नानोरी, सानोरी, करजगाव आदी गावांत पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली. वादळी वाऱ्यासह शनिवारी झालेल्या पावसामुळे रात्री ९.३० च्या सुमारास शिरजगाव कसबा रोडवरील परशुराम पब्लिक स्कूलजवळ बाभळीचे झाड कोसळल्याने रविवारी दु. वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे झाडाची कटाई करून रस्ता मोकळा करण्यात आला. त्याचप्रमाणे मानकरपुरा परिसरातील ठाकरे प्लाॅट येथील सर्व्हीस लाईनचे पाणी घरात घुसल्यामुळे अशोक कहाले, अतुल मेंगजे, विनायक सातपुते, अविनाश सातपुते, दिलीप गुर्जर, बंजू सातपुते, बाबूलाल धर्मे, किसन भुरमुदे, सचिन धर्मे, देवानंद भुरमुदे, प्रल्हाद खाजीने, भुलू भुरमुदे, अशोक श्रीराव, रजिंद्र अस्वार या गावकऱ्यांचे नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंग-कौंडण्यपूरदरम्यानच्या पुलाला पाणी अडल्यामुळे ते शेतात शिरल्याने या भागातील शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पेरलेले बियाणेही पाण्यात वाहून गेले. धारवाडा, छिदवाडी, बोर्ज, जहांगिरपूर या चार मौज्यांमधून येणारे पावसाचे पाणी अंनसिंगी-कौंडण्यपूर मार्गावर असलेल्या पुलामधून जात असल्याने शेतात पाणी साचले.

बारू येथे वीज कोसळून १७ वर्षीय मुलगी ठार
शेतातपेरणी करीत असताना वीज कोसळून वनिता शालीकराम कास्देकर, १७, रा. बारू ता. धारणी या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. धारणीपासून १५ कि.मी.अंतरावर बारू येथील शेतात वनिता आई भावासोबत पेरणी करीत होती. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने आई भावाने झोपडी गाठली. परंतु, वनिता पेरणी करीत राहिली. त्यातच वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. तिची आई भाऊ बचावले. घटनेची माहिती सरपंच रामरतन शिंगारे यांनी तहसीलदार सतीश कंडसे ठाणेदार किशोर गवई यांना दिली. धारणी येथील रुग्णालयात वनिताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले.

^४०० हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज असून, वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. तलाठी, कृषी सहायक यांना प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल मागितला आहे. अचलपूर तालुक्यातील असदपूर, येसुर्णा मुसळधार पावसामुळे नदी नाल्याला पूर आला. राहुलतायडे, तहसीलदार, दर्यापूर.
मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी येथील जिनी कुमरे या रात्री १० वाजताच्या सुमारास शौचासाठी दमयंती नदीच्या काठावर गेल्या होत्या. पाय घसरून त्या पुरात वाहून गेल्या. आज चिखलसावंगी नजीक त्यांचा मृतदेह आढळला.
बातम्या आणखी आहेत...